यिन निवडणुकीत महेश मचे यांची अध्यक्षपदी निवड

अहिल्यानगर : सकाळ माध्यम समूहाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)’ या युवक चळवळीअंतर्गत न्यू लॉ कॉलेज, अहिल्यानगर येथे पार पडलेल्या निवडणुकीत महेश मचे यांची अध्यक्ष (एल.एल.बी) पदासाठी निवड झाली आहे.

महाविद्यालयीन स्तरावर झालेल्या या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी महेश मचे यांच्यावर विश्वास व्यक्त करत मतदानाद्वारे त्यांची निवड केली. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि विद्यार्थ्यांशी असलेल्या सुसंवादामुळे त्यांना ही संधी मिळाली असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. महेश मचे हे पाथर्डी तालुक्यातील मोहोज बुद्रुक येथील रहिवासी असून त्यांचे वडील देखील गावचे सरपंच राहिलेले आहेत.
अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर महेश मचे यांच्यावर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे नेतृत्व करण्याची मोठी जबाबदारी आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार, सामाजिक जाणीव आणि व्यक्तिमत्व विकास घडविण्यासाठी ते कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
यिन या युवक चळवळीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी महेश मचे सक्रिय भूमिका बजावतील, असा विश्वास व्यक्त करत आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्यासह न्यू लॉ कॉलेजचे प्राचार्य एम एम तांबे यांच्यासह सर्व शिक्षक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.







