मिरी उपबाजार समितीसाठी दहा एकर जागेला शासनाची मंजुरी!

मिरीकरांसाठी ऐतिहासिक निर्णय

मिरी उपबाजार समितीसाठी दहा एकर जागेला शासनाची मंजुरी!

मिरी परिसराचे आर्थिक चक्र गतिमान होणार

 

सचिन नन्नवरे 

मिरी, ता. पाथर्डी : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मिरी येथील उपबाजार समितीच्या जागेचा प्रलंबित प्रश्न अखेर शासन स्तरावर मार्गी लागला आहे. मिरी येथील गट क्रमांक ९६५ मधील चार हेक्टर म्हणजेच सुमारे दहा एकर शासकीय जमीन पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारासाठी देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी जारी करण्यात आला असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.

या ऐतिहासिक निर्णयामुळे मिरी पंचक्रोशीसह पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागाच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळणार आहे. उपबाजार आवार उभारल्यानंतर मिरी परिसरातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्रीसाठी दूरवर घेऊन जाण्याची गरज कमी होणार आहे. स्थानिक पातळीवर शेतमालाची खरेदी-विक्री, साठवणूक आणि वाहतूक वाढल्याने व्यापारी व शेतकऱ्यांचे दळणवळण मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.

शेतीमालाच्या व्यवहारातून परिसरातील हॉटेल, वाहतूक, हमाली, किराणा, कृषी सेवा केंद्रे, यंत्रसामग्री, पॅकिंग आणि इतर लघुउद्योगांनाही व्यवसायवाढीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन मिरी परिसराचे आर्थिक चक्र अधिक वेगाने फिरण्यास मदत होणार असल्याने हा निर्णय मिरीकरांसाठी आनंददायी आणि दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे.

मिरी येथे उपबाजार आवार उभारण्यासाठी पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन तसेच विद्यमान संचालक मंडळाने गांभीर्याने आणि सातत्याने पाठपुरावा केला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिकाताई राजळे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि दिवंगत माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यासह बाजार समितीच्या अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी या प्रश्नासाठी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला. या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला जागेचा प्रश्न मार्गी लागल्याचे पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा. सुभाष बर्डे यांनी सांगितले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्राताई पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पणनमंत्री जयकुमार रावल आणि महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रस्तावाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून मान्यता मिळवून देण्यासाठी योगदान दिल्याबद्दल पाथर्डी बाजार समितीच्या वतीने त्यांचे जाहीर आभार मानत असल्याचेही सभापती प्रा. बर्डे यांनी नमूद केले.

उपबाजार आवारासाठी जागा मिळविण्याच्या प्रक्रियेत पाथर्डी बाजार समितीचे विद्यमान संचालक तथा आडगावचे माजी सरपंच जिजाबापू लोंढे आणि भाजपचे युवा नेते वैभवशेठ खलाटे यांनीही सातत्याने पाठपुरावा केला. महसूल व वन विभागातील संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्तावाला गती दिली. त्यामुळे या यशामध्ये सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचे बहुमूल्य योगदान असल्याचे प्रा.बर्डे यांनी सांगितले.

शासनाकडून जागेला मंजुरी मिळाल्यामुळे आता पुढील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून त्या ठिकाणी लवकरात लवकर सुसज्ज उपबाजार आवार उभारण्यासाठी पाथर्डी बाजार समिती प्रयत्न करणार आहे. उपबाजाराच्या माध्यमातून मिरीसह परिसरातील गावांच्या विकासाचा कायापालट करण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.

🔴 मिरीच्या विकासाला मिळणार नवे बळ

  • गट क्रमांक ९६५ मधील चार हेक्टर अर्थात सुमारे दहा एकर जागेला मंजुरी
  • शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर शेतमाल विक्रीची सुविधा
  • शेतमालाची खरेदी-विक्री आणि वाहतूक वाढणार
  • व्यापारी, हमाल, वाहनचालक आणि लघुउद्योजकांना रोजगार
  • हॉटेल, कृषी सेवा केंद्रे व पूरक व्यवसायांना चालना
  • मिरी पंचक्रोशीसह पाथर्डीच्या पश्चिम भागाचा आर्थिक विकास वेगाने होणार


“शासनाने जागेला मान्यता दिल्यामुळे मिरी उपबाजार आवाराच्या उभारणीतील सर्वांत मोठा अडथळा दूर झाला आहे. बाजार समितीच्या माध्यमातून पुढील प्रक्रिया वेगाने पूर्ण करून सुसज्ज उपबाजार उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील.”

— प्रा. सुभाष बर्डे, सभापती, पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समिती

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें