पाथर्डी भूमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार उघड!

पाथर्डी भूमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार उघड!

चक्क ४-५ दिवसांच्या सह्या एकाच दिवशी; अधिकाऱ्यांचा प्रताप कॅमेऱ्यात कैद

पत्रकार शंनो पठाण | पाथर्डी

पाथर्डी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील कारभाराचा भोंगळेपणा आता उघडपणे समोर आला असून, सरकारी नियमांना हरताळ फासणारे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. अधिकारी वेळेवर कार्यालयात उपस्थित नसणे, हजेरी रजिस्टरमध्ये एकाच दिवशी अनेक दिवसांच्या सह्या करणे, कार्यालय बंद ठेवणे, हालचाल रजिस्टर गायब असणे आणि नागरिकांना तासनतास दारात बसवून ठेवणे, अशा गंभीर तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

साडेअकरा वाजता ‘साहेबांची एन्ट्री’!

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत अधिकारी ए. व्ही. गीते कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यानंतर कार्यालयात आल्यानंतर त्यांनी चक्क मागील चार ते पाच दिवसांच्या हजेरीच्या सह्या एकाच वेळी केल्याचे उघड झाले. हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून, सरकारी हजेरी व्यवस्थेची खिल्ली उडाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

नगर भूमापन विभागाला कुलूप; लाईटही बंद!

नागरिक कामासाठी नगर भूमापन विभागात गेले असता विभागाचे दरवाजे बंद होते. कार्यालयातील लाईट बंद असून कोणताही कर्मचारी अथवा अधिकारी उपस्थित नव्हता. सरकारी कार्यालय सुरू असताना अशी परिस्थिती पाहून नागरिक संतप्त झाले. “सरकारी कार्यालय जनतेसाठी आहे की अधिकाऱ्यांच्या मर्जीप्रमाणे?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अधिकारी-कर्मचारी गायब; नागरिक दारातच!

कामासाठी आलेले अनेक शेतकरी व नागरिक कार्यालयाबाहेर तासनतास थांबून होते. मात्र त्यांना मार्गदर्शन करणारा किंवा काम पाहणारा एकही जबाबदार कर्मचारी हजर नव्हता. जनतेच्या करातून पगार घेणारे अधिकारी कार्यालयातच नसतील तर सामान्य माणसाने न्याय कुणाकडे मागायचा? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

‘मोजणीला गेलो’चे कारण; पण रजिस्टरच गायब!

कार्यालयात कर्मचारी नसल्याबाबत विचारणा केल्यावर “मोजणीला गेले आहेत” असे सांगितले जाते. मात्र आश्चर्य म्हणजे, हजेरी रजिस्टरवर एकाही कर्मचाऱ्याच्या सह्या नव्हत्या. हालचाल रजिस्टर (Movement Register) उपलब्ध नव्हते, तर दौरा रजिस्टरमध्ये चक्क एप्रिल महिन्याच्या नोंदी दिसून आल्या. मे महिन्यातील कोणतीही नोंद नसल्याने अधिकारी-कर्मचारी नेमके कुठे आणि कोणत्या कामावर आहेत, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

मोजणीचा नियम धाब्यावर!

नियमांनुसार जमिनीची मोजणी करताना संबंधित शेजारील शेतकऱ्यांना दोन ते तीन दिवस आधी लेखी नोटीस देणे बंधनकारक आहे. मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता थेट मोजणी करून हद्द कायम केली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.

प्रभारी राजमुळे कामकाज विस्कळीत?

कार्यालयाचा प्रभारी चार्ज राहुरी येथील अधिकाऱ्यांकडे असल्याचे सांगितले जाते. मात्र त्या आठवड्यातून केवळ एक-दोन दिवसच कार्यालयात येत असल्याची माहिती आहे. काही नागरिक दोन-दोन महिन्यांपासून मोजणी व इतर कामांसाठी हेलपाटे मारत आहेत. नवीन नियुक्त झालेले काही कर्मचारी नियमित कार्यालयात येतात की नाहीत, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

जनतेचा संतप्त सवाल

एकीकडे शासन “दप्तर दिरंगाई रोखा”चे आदेश देते, तर दुसरीकडे पाथर्डी भूमी अभिलेख कार्यालयात मनमानी पद्धतीने कारभार सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. “गीते साहेब, नागरिक दारात बसून वाट पाहत आहेत आणि तुम्ही चार-चार दिवसांच्या सह्या एकाच दिवशी करत आहात, हा कसला कारभार?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

या सर्व प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता पाथर्डी तालुक्यातून होत आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें