खाकी वर्दीतील पुस्तकप्रेम; मातृशाळेला शेकडो पुस्तकांची भेट
पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे यांच्या पुढाकारातून सोनोशीत ‘कुसुमाग्रज बाल वाचनालय’

सचिन नन्नवरे
पाथर्डी : ज्या शाळेत शिक्षणाची सुरुवात झाली, त्याच शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, या उद्देशाने पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकासाहेब काकडे यांनी शेकडो पुस्तकांची भेट दिली. अहिल्यानगर येथील सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले काकडे यांच्या पुढाकारातून सोनोशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘कुसुमाग्रज बाल वाचनालय’ सुरू करण्यात आले. ग्रंथदिंडी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत वाचनालयाचे उद्घाटन झाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री ब्रह्मनाथ मंदिरापासून शाळेपर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. सजविलेल्या पालखीत ग्रंथ ठेवण्यात आले होते. पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थी, डोक्यावर कलश घेतलेल्या विद्यार्थिनी, लेझीम पथक आणि पताका घेऊन सहभागी झालेल्या मुलांमुळे दिंडीला उत्सवी स्वरूप आले. ग्रामस्थांनीही या उपक्रमात सहभाग नोंदविला.
पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे, त्यांचे वडील काकासाहेब काकडे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. पुस्तकांची आकर्षक मांडणी आणि रांगोळीतून साकारलेले ‘ग्रंथ हेच गुरू’ हे घोषवाक्य उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना काकडे यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहण्याचे आवाहन केले. मुलांच्या शिक्षणाबाबत पालकांनी सजग राहावे, तसेच नोकरी अथवा व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
सोहळ्यास सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. ग्रामस्थांनी काकडे कुटुंबीयांच्या योगदानाचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक देवीदास नाना बडे, पदवीधर शिक्षक अमोल भंडारी व बाबासाहेब खेडकर, तसेच सहशिक्षक नारायण दहीफळे, विजय पवार आणि अण्णासाहेब साळुंके यांनी परिश्रम घेतले.
शाळेतील प्रत्येक मूल आपलेच समजा! – PSI काकडे
“शाळेतील प्रत्येक मुलगा-मुलगी आपलेच अपत्य आहे, ही भावना ठेवून सर्वांनी शाळेच्या पाठीशी उभे राहावे. बाहेरगावी नोकरी अथवा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक सुपुत्राने शाळेच्या प्रगतीसाठी पुढे आले पाहिजे.” असे आवाहन अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे यांनी यावेळी केले.







