वांबोरी चारीच्या पाण्यासाठी सोमवारी रास्ता रोकोचा निर्धार
चिंचोंडीतील सहविचार सभेत लाभधारक गावांची एकजूट; पक्षीय जोडे बाजूला ठेवून लढा उभारण्याचा निर्णय

सचिन नन्नवरे
पाथर्डी : वांबोरी चारीच्या पाण्यासाठी सोमवारी (दि. १९) तिसगाव येथे नियोजित रास्ता रोको आंदोलन करायचेच, असा ठाम निर्धार लाभधारक गावांतील सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी केला. चिंचोंडी येथील शिवनेरी मंगल कार्यालयात शनिवारी (दि. १७) सायंकाळी झालेल्या सहविचार सभेत पक्षीय मतभेद बाजूला ठेवून पाण्यासाठी एकत्रित लढा उभारण्यावर एकमत झाले.
वांबोरी चारीच्या पाणीप्रश्नावर आणि सोमवारच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक उपस्थितांनी मनोगते व्यक्त करत पाणीपुरवठ्यातील अडचणी, शेतकऱ्यांची नाराजी आणि आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. पाण्याचा प्रश्न सर्व लाभधारक गावांचा असल्याने पक्षविरहित लढ्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन वक्त्यांनी केले. त्याला उपस्थितांनी प्रतिसाद देत पक्षीय जोडे बाजूला ठेवून आंदोलनात सहभागी होण्याचे मान्य केले.
आजवर निवेदने आणि आंदोलने होऊनही वांबोरी चारीच्या पाण्याचा प्रश्न कायम असल्याबद्दल सभेत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. ज्या उद्देशाने वांबोरी चारी सुरू करण्यात आली, तो उद्देश आजतागायत पूर्ण झाला नसल्याची भावना उपस्थितांनी मांडली. लाभधारक गावांना पूर्ण दाबाने पाणी मिळण्यासाठी आता एकजुटीने ठाम भूमिका घेण्याची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त झाले.
सभेचे निमंत्रक माजी सभापती संभाजीराव पालवे, माजी सभापती बाळासाहेब अकोलकर, माजी सरपंच राजेंद्र पाठक सर, चेअरमन बंडू पाठक, अंबादास डमाळे आदींसह पाथर्डी तालुक्यातील वांबोरी चारी लाभधारक गावांतील राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेतील ठाम भूमिकेमुळे सोमवारी होणाऱ्या आंदोलनाकडे परिसराचे लक्ष लागले आहे.
पाण्यासाठी पक्षीय जोडे बाजूला!
पाण्याच्या प्रश्नावर पक्षविरहित एकजूट उभारण्याचा सूर सहविचार सभेत उमटला. राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी आंदोलनात सहभागी व्हावे, या आवाहनाला उपस्थितांनी साथ दिली. सोमवारी (दि. १९) सकाळी दहा वाजता तिसगाव येथे रास्ता रोको करण्याचा निर्धार सभेत व्यक्त करण्यात आला.







