आठ दिवसांत मिरीचा पाणीपुरवठा सुरळीत करा – आ. तनपुरे
मिरी येथे आमदार तनपुरे यांच्या जनता दरबारात तक्रारींचा पाऊस
पाणी प्रश्न न सुटल्यास विधान परिषदेत लक्षवेधी मांडण्याचा तनपुरेंचा इशारा

मुख्य संपादक : सचिन नन्नवरे
पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे गुरुवारी झालेल्या वादळी ग्रामसभेनंतर दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी विधानपरिषदेचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात जनता दरबार घेण्यात आला. यावेळी ग्रामस्थ व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गावातील विविध समस्या आमदार तनपुरे यांच्यासमोर मांडल्या. यावेळी अनेक प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना तनपुरे यांनी दिल्या.
मिरी गावचा सर्वात ज्वलंत प्रश्न असलेल्या जलजीवन योजनेचे काम अद्याप पूर्ण झालेले नसून गावाला सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याची बाब संतोष शिंदे यांनी आमदार तनपुरे यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनीही गावातील पाणीपुरवठ्याची वस्तुस्थिती सर्वांसमक्ष मान्य केली.

यापूर्वी याच जलजीवन योजनेच्या पाणी प्रश्नासाठी आमदार तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली मिरी येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही प्रश्न प्रलंबित असल्याने तनपुरे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. कोट्यवधी रुपये खर्च करूनही त्याचा अपेक्षित लाभ ग्रामस्थांना मिळत नसेल तर ही लाजिरवाणी बाब असल्याचे सांगत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

येत्या आठ दिवसांत नवीन पाण्याच्या टाक्यांमधून मिरी गावाचा पाणीपुरवठा सुरळीत करा; अन्यथा आगामी अधिवेशनात विधान परिषदेत लक्षवेधी मांडून ठेकेदाराऐवजी संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यासाठी शासनाचे लक्ष वेधू, असा इशारा आमदार तनपुरे यांनी दिला. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

सिंगल फेज वीजप्रश्नावर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संपर्क
रेणुकाईवाडी शिवारातील सामाजिक कार्यकर्ते एकनाथ झाडे, बंडू झाडे, महेश बंडू झाडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी सिंगल फेज वीजपुरवठ्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर आमदार तनपुरे यांनी थेट महावितरणच्या राज्यस्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना केल्या. गरज पडल्यास या कामासाठी स्वतः निधी देण्याची तयारीही तनपुरे यांनी दर्शविली.
जेसीबी चालकांची बिले रखडली
विविध शासकीय योजनांसाठी खोदकाम करणाऱ्या जेसीबी चालकांची बिले थकीत असल्याचा प्रश्नही जनता दरबारात मांडण्यात आला. आमदार तनपुरे यांनी संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधून बिले देण्याच्या सूचना केल्या. मात्र, शासनाकडूनच पैसे मिळाले नसल्याचे सांगत ठेकेदाराने असमर्थता व्यक्त केली.
विकासकामांची चौकशी करा – सामाजिक कार्यकर्त्या उज्वला गवळी
सामाजिक कार्यकर्त्या उज्वला गवळी यांनी गावातील विविध विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. शाळेचे कंपाउंड, पिण्याचे पाणी आणि मत्स्य तलाव यासाठी शासनाकडून निधी वितरित झाला असतानाही प्रत्यक्षात कामे झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी स्वतंत्र चौकशी करण्याचे आश्वासन आमदार तनपुरे यांनी दिले.

चौकशी न झाल्यास आगामी काळात रास्ता रोको आंदोलन करणार – संतोष शिंदे
भाजपचे मंडळ अध्यक्ष संतोष शिंदे यांनी, आपण यापूर्वी सरपंच असलेल्या कार्यकाळातील कामांचीही चौकशी करावी, जेणेकरून ग्रामस्थांचा संभ्रम दूर होईल, अशी भूमिका मांडली. तसेच चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या विकासकामांना विरोध करणाऱ्यांना ठेकेदारांकडून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला. या बाबत चौकशी लावूनही संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे सांगत, विकासकामांमधील कथित आर्थिक अपहाराची चौकशी न झाल्यास आगामी काळात संबंधित कामांविरोधात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शिंदे यांनी दिला.

शेतकरी कर्जमाफीचा मुद्दाही मुख्यमंत्र्यांकडे मांडणार – आमदार तनपुरे
ग्रामस्थांच्या विविध समस्या ऐकून घेतल्यानंतर बोलताना आमदार तनपुरे म्हणाले की, एकविसाव्या शतकातही नागरिकांना मूलभूत प्रश्नांसाठी संघर्ष करावा लागत असेल तर ही खेदाची बाब आहे. शासनाच्या आतापर्यंतच्या कर्जमाफीचा एकदाही लाभ न मिळालेल्या तसेच नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही आगामी कर्जमाफीत प्राधान्याने लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे हा प्रश्न मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अवैध दारूविक्रीवर दोन तासांत कारवाई
जनता दरबारात सामाजिक कार्यकर्ते एकनाथ झाडे यांनी मिरी गावातील शाळेसमोर ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीचा मुद्दा उपस्थित केला. ही दुकाने तात्काळ बंद करण्याची मागणी त्यांनी केली. या मागणीची तातडीने दखल घेत आमदार तनपुरे यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून अवैध दारूविक्रीची दुकाने बंद करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. विशेष म्हणजे, आमदार तनपुरे मिरीतून रवाना झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत पोलिसांनी कारवाई करत अवैध दारूविक्री करणाऱ्या तीन दुकानांवर कारवाई करून संबंधितांना ताब्यात घेत दुकाने बंद केली. व या संदर्भात गुन्हा देखील दाखल केला आहे. या कारवाईमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
महसुली हद्दीमुळे शेतकरी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित
मिरी गावाच्या बस स्थानकापासून अवघ्या पाचशे मीटरवर अंतरावर रेणुकाईवाडी गावाची महसुली हद्द असून इतर ठिकाणी देखील शंकरवाडी गावची हद्द आहे. यामुळे मिरी गावच्या रहिवाशाना जॉब कार्ड मिरी गावचे मिळाले असून शासकीय योजनेचा लाभ घेताना ऑनलाईन ॲप मध्ये माहिती भरताना मात्र महसुली क्षेत्राचा एरर येत असल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याची बाब युवा शेतकरी धनंजय गवळी यांनी आमदार तनपुरे यांच्या निदर्शनास आणून दिली. सदर बाब लक्षात येताच आमदार तनपुरे यांनी याबाबत आपण थेट जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करू व हा प्रश्न निकाली काढण्यासाठी विशेष लक्ष घालू असे आश्वासन दिले आहे.
ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्याने जनता दरबार चांगलाच चर्चेत आला. आता आठ दिवसांत मिरीचा पाणीप्रश्न प्रत्यक्षात सुटतो का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
यावेळी पाथर्डी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राजेंद्र धस, जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उप अभियंता अश्विनी घाटकर, विस्तार अधिकारी रानमाळ व गिऱ्हे, जलजीवन योजनेचे अभिजित हुगे, तलाठी प्रफुल्ल घोलप, महावितरण चे उप अभियंता अतुल गर्जे, ग्रामसेवक रमेश त्रिंबके, सहाय्यक कृषी अधिकारी महेश घोरपडे आदी अधिकाऱ्यांसह भाजपचे मंडळाध्यक्ष संतोष शिंदे, सामाजिक कार्यकर्ते डॉ.बबनराव नरसाळे, राजू मामा तागड, जगदीश सोलाट, बंडू आबा झाडे, एकनाथ झाडे, सुभाष गवळी, डॉ. नंदकिशोर नरसाळे, भागिनाथ गवळी, सौ.उज्वला गवळी, राजू शेख, जालिंदर गवळी, जालिंदर शिंदे, जगन्नाथ जगताप, शिवाजी वेताळ मेजर, हरी दाणे, राहुल दाणे, बंटी निमसे, दिनेश वेताळ, अशोक दाणे, संभाजी दारकुंडे, अमोल दाणे, महेंद्र सोलाट, तुपे मॅडम, विजया सोलाट, ज्ञानेश्वर दाणे, आकाश धनवटे, जयदीप गवळी, वसंत वाघमारे, लक्ष्मण सोलाट, बाबुराव जमधडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







