तनपुरे–कर्डिले समीकरणामुळे पाथर्डी तालुक्यातील राजकारण बदलणार; कर्डिलेंच्या कार्यकर्त्यांच्या मनात नेमके काय ? 

तनपुरे–कर्डिले समीकरणामुळे पाथर्डी तालुक्यातील राजकारण बदलणार

सचिन नन्नवरे 

पाथर्डी : राहुरी–नगर–पाथर्डी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पूर्वीपासून व्यक्त करण्यात येत असलेला राजकीय अंदाज अखेर खरा ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

पोटनिवडणुकीपूर्वीच तनपुरे आणि अक्षय कर्डिले यांच्यातील संभाव्य समझोत्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यानुसार तनपुरे यांनी पोटनिवडणुकीत माघार घेतल्याने कर्डिले यांचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा झाला. आता तनपुरे यांच्या भाजप प्रवेशामुळे त्यांच्या विधानपरिषदेचा मार्गही सुकर झाल्याची चर्चा रंगली आहे. परिणामी, भविष्यात तनपुरे आणि कर्डिले हे दोघेही आमदार म्हणून एकत्र काम करताना दिसणार आहे.

या घडामोडीमुळे पाथर्डी तालुक्यातील मिरी-करंजी व तिसगाव जिल्हा परिषद गटातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांसमोर नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला असून स्थानिक पातळीवर मोठा राजकीय शून्य निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले तनपुरे यांनी अनेक वर्षे भाजपच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यादरम्यान त्यांचा दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्याशी अनेकदा टोकाचा संघर्ष झाला होता. त्या काळात दोन्ही गटांमध्ये तीव्र राजकीय तणाव होता. मात्र, आता या सर्व घटना इतिहासजमा होत असून नव्या राजकीय समीकरणाला सुरुवात झाली आहे.

 

तनपुरे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याने दोन्ही गटांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु गावोगावी स्थानिक पातळीवर टोकाचा संघर्ष करणारे तनपुरे व कर्डिले यांचे कार्यकर्ते भविष्यात एकत्र येऊन त्यांचे मनोमिलन होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मतदारसंघाला मिळणार दोन आमदार दादांची साथ 

तनपुरे यांच्या संयमी आणि सुसंस्कृत स्वभावामुळे विरोधकांकडूनही त्यांच्यावर टोकाची टीका होत नाही. भाजप कार्यकर्त्यांमध्येही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आदराची भावना असल्याचे दिसून येते. त्यामुळे तनपुरे यांच्या पक्षप्रवेशाने अक्षय दादा व प्राजक दादा या दोन दादांची जोडी पाथर्डी तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक पाऊल ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, तनपुरे यांच्यासह शिराळचे सरपंच रवींद्र मुळे, नंदराज कुटे पाटील, अंबादास डमाळे, विजय पालवे, जालिंदर वामन, नागेश आव्हाड, राजेंद्र घोरपडे, संतोष गरुड, राजेंद्र दगडखैर, भीमराज सोनवणे, विलास टेमकर, सुनील लवांडे, गोरख पालवे, गौरव गर्जे, ईश्वर पालवे, अशोक टेमकर, नितीन लवांडे, मारुती क्षेत्रे आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

विखेंनी तनपुरेंचा पक्षप्रवेश घडवून आणल्याने कर्डिले समर्थक नाराज? भाजप कार्यकर्त्यांच्या मनात नेमके काय ? 

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भाजपमध्ये प्रक्ष प्रवेश घडवून आणण्यामध्ये माजी खासदार तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचे लपून राहिले नाही. कारण कालच्या तनपुरे यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याला सुजय विखे वगळता जिल्ह्यातील एकही नेता उपस्थित नव्हता. विखे आणि तनपुरे यांनी एकमेकांची गळाभेट घेतल्याने विखे समर्थकांनी सोशल मीडियावर या गळाभेटीचे फोटो शेअर करत तनपुरे यांचे स्वागत केले. परंतु  दुसरीकडे कर्डिले समर्थकांमध्ये मात्र शुकशुकाट दिसून आला. कर्डिले समर्थकांनी सोशल मीडियावर तनपुरेंच्या पक्षप्रवेशाबाबत प्रतिक्रिया देणे, स्वागत करणे व स्टेटस ठेवणे हे प्रकर्षाने टाळल्याचे लपून राहिले नाही. त्यामुळे तनपुरे यांच्या पक्ष प्रवेशाने कर्डिले समर्थक नाराज झाले आहेत का? तनपुरे यांच्या भाजप प्रवेशास पक्षाअंतर्गत विरोध होता का? की या नाराजीला वेगळे काही कारण आहे हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.

अक्षय कर्डिलेंकडून स्वागत , मात्र तनपुरे – कर्डिले मनापासून एकत्र येणार का ? 

अक्षय कर्डिले यांच्या विजयास प्राजक्त तनपुरे यांनी घेतलेली माघार ही महत्वाची बाब ठरल्याचे राजकीय जाणकार सांगतात. तसेच मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या अनेक नेत्यांनी तनपुरे यांचे जाहीररित्या आभार देखील मानले होते. त्यामुळे निकाल लागल्यावर आमदार अक्षय कर्डिले हे तनपुरे यांची आवर्जून भेट घेऊन आभार व्यक्त करतील अशी अपेक्षा होती व तसे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले देखील होते. परंतु प्रत्यक्षात मात्र ही भेट झाल्याचे दिसून आले नाही. तसेच तनपुरे यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याला आमदार अक्षय कर्डिले देखील उपस्थित राहतील अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत होती. प्रत्यक्षात मात्र तसे झाले नाही. तसेच अक्षय कर्डिले यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वर देखील काही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे तनपुरे व कर्डिले यांच्यात अजूनही मतभेद आहेत का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हे जाणून घेण्यासाठी आज झालेल्या चौंडी येथील कार्यक्रमात माध्यम प्रतिनिधींनी तनपुरे व कर्डिले यांना एकत्रित गाठून या बाबत विचारणा केली. त्यावेळी आमदार कर्डिले यांनी तनपुरे यांचे पक्षात स्वागत करून भविष्यात एकत्रित काम करू असे सांगितले. तर तनपुरे यांनी देखील पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू असे म्हटले आहे. परंतु ते काहीही असले तरी देखील आता दोन्ही गट एकाच पक्षात राहणार आहेत हे विसरून चालणार नाही. तनपुरे मात्र भाजप मध्ये राहून देखील विखे गटाच्या अधिक जवळ राहतील हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नाही.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें