श्रीक्षेत्र दगडवाडीवर दुःखाचा डोंगर
सुभेदार बबन शिंदे यांना शासकीय इतमामात अश्रूपूर्ण निरोप

अशोक मोरे
पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र दगडवाडी गावावर दुःखाची छाया पसरली असून, गावचे सुपुत्र आणि देशसेवेत कार्यरत असलेले सुभेदार बबन दत्तात्रय शिंदे यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. पंजाब राज्यातील अमृतसर येथे कर्तव्य बजावत असताना मंगळवारी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. वयाच्या अवघ्या ४५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याने गावाने एक कर्तव्यनिष्ठ, शूर आणि कर्तृत्ववान सुपुत्र गमावला आहे.

बुधवारी सकाळी त्यांचे पार्थिव पुणे येथून विशेष वाहनाने अहिल्यानगर मार्गे दगडवाडी येथे आणण्यात आले. पार्थिव गावात पोहोचताच वातावरण भावनिक झाले. सकाळी नऊ वाजता त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले होते. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अश्रूपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू होते, तर “अमर रहे”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

यानंतर सुभेदार शिंदे यांच्या पार्थिवाची सजवलेल्या रथातून भव्य अंत्ययात्रा काढण्यात आली. गावातील मुख्य मार्गावरून अंत्ययात्रा निघाली असता ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून अंतिम निरोप दिला.
स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. अहिल्यानगर पोलीस मुख्यालयाच्या वतीने हवेत तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्याचप्रमाणे आर्मी सेंटरच्या जवानांनीही तीन राऊंड फायर करून आपल्या सहकाऱ्याला सन्मानाची सलामी दिली.

या वेळी सरपंच सुभाष शिंदे, तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, जिल्हा सैनिक बोर्डाचे चंद्रकांत भगत, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अक्षय कर्डिले, तसेच महंत ज्ञानेश्वर महाराज कराळे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. आर्मीचे कमांडर ऑफिसर सुभेदार रंगनाथन, सुभेदार आर. के. ढाका, सुभेदार मेजर बलवान सिंग, कॅप्टन राघवन, कॅप्टन अभिमन्यू यांच्यासह त्रिदल संघटनेचे माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दगडवाडीसह परिसरातील हजारो महिला, पुरुष, युवक तसेच करंजी, खांडगाव, वैजूबाभळगाव येथील शालेय विद्यार्थ्यांनी देखील अंत्ययात्रेत सहभागी होत “सुभेदार बबन शिंदे अमर रहे” अशा घोषणांनी वातावरण भारावून टाकले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होते.
सुभेदार बबन शिंदे यांनी जम्मू-काश्मीर, पठाणकोट आणि अमृतसर अशा संवेदनशील भागांत सेवा बजावत देशासाठी आपले योगदान दिले होते. अत्यंत गरीब कुटुंबातून पुढे येत त्यांनी आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने हे स्थान मिळवले होते. त्यांच्या कर्तृत्वामुळे गावाचे नाव उज्ज्वल झाले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई व भाऊ असा परिवार असून त्यांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत असून, एका शूर जवानाला अश्रूपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.







