संत ज्ञानेश्वर विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला मान्यता; शैक्षणिक परंपरेला लाभली नवी उंची

पाथर्डी : प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे शनिवार दि. ७ रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाथर्डी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव कराड हे होते. त्यांच्या शुभहस्ते शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक तसेच विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना शिवाजीराव कराड म्हणाले की, “शिस्त, परिश्रम आणि सातत्य ही यशाची खरी गुरुकिल्ली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अपार गुणवत्ता असून योग्य संधी व मार्गदर्शन मिळाल्यास ते निश्चितच उज्ज्वल भवितव्य घडवू शकतात,”. पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे त्यांनी विशेष कौतुक करत इतर विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास उद्योजक भगवानराव दराडे, पत्रकार शंनो पठाण, प्राचार्य दीपक गर्जे, सहदेवदादा शिरसाट, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल शिरसाट, उपाध्यक्ष सुनील शिरसाट, खजिनदार मंदाकिनी शिरसाट, सचिव महेंद्र शिरसाट तसेच संस्थेचे सर्व विश्वस्त व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य मिसाळ सर यांनी केले. त्यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्ता, स्पर्धा परीक्षा, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात मिळवलेल्या यशाचा आढावा घेत शाळा केवळ अभ्यासापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असल्याचे नमूद केले.
पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव महेंद्र शिरसाट यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्माराम दहिफळे यांनी नेटके व प्रभावीपणे केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आणि यशाला दिलेली ही दाद त्यांच्या आत्मविश्वासात भर घालणारी ठरली असून संत ज्ञानेश्वर विद्यालयातून घडणारी गुणवंत पिढी समाजाच्या विकासात मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.







