अभिनेता वजीर शेख यांना जिल्हास्तरीय कलावंत दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
शिवजयंतीनिमित्त पुण्यात होणार पुरस्काराचे वितरण

पाथर्डी तालुका प्रतिनिधी : सुनील नजन
पाथर्डी तालुक्यातील पाडळी येथील चित्रपट अभिनेते वजीर शेख यांना जिल्हास्तरीय कलावंत दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने १९ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे येथे होणाऱ्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांचा या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
गेल्या २० वर्षांपासून वजीर शेख हे नाटक, दूरचित्रवाणी मालिका, वेब सिनेमा तसेच शॉर्ट फिल्म्समधून सातत्याने कार्यरत आहेत. अभिनयासोबतच सामाजिक क्षेत्रात तसेच पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात येत आहे. यापूर्वीही त्यांना विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
पुणे येथील स्वराज्य फिल्म प्रोडक्शन संघटना व महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय मानव अधिकार न्यायिक सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या “चित्रपट सृष्टीचे जनक – जिल्हास्तरीय कलावंत दादासाहेब फाळके व सह्याद्री रत्न पुरस्कार सोहळा २०२६” या कार्यक्रमात हा सन्मान प्रदान केला जाणार आहे.
हा कार्यक्रम पिंपरी-चिंचवड येथील संत तुकाराम नगरमधील आचार्य अत्रे सभागृहात पार पडणार असून कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार अमोल कोल्हे (शिरूर लोकसभा) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार महेश लांडगे (भोसरी विधानसभा) यांच्यासह अनेक मान्यवर, कलाकार, दिग्दर्शक, निर्माते व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
या पुरस्काराबाबतची माहिती कार्यक्रमाचे मुख्य आयोजक गिरीश राजूरकर, मंगेश कसवे, सिद्धांत शिंदे व राजेंद्र ठोंबरे यांनी दिली. वजीर शेख यांच्या या यशाबद्दल पाडळी परिसरातून तसेच पाथर्डी तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







