साडेचार कोटींचा हिशोब द्या! मिरीत तनपुरेंच्या प्रश्नांवर अधिकारी निरुत्तर
मिरी पाणीप्रश्नावर भव्य रस्ता रोको आंदोलन; लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

पाथर्डी – पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील जलजीवन योजनेतील दिरंगाई, निकृष्ट कामकाज आणि आर्थिक अनियमिततेविरोधात झालेल्या रास्ता रोको आंदोलनात गावकऱ्यांचा प्रचंड जनसागर उसळला. आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी करत संबंधित अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार करत चांगलेच फैलावर घेतले.

साडेचार कोटींचा निधी; तीन वर्षे उलटली तरी काम अपूर्ण!

आघाडी सरकारच्या काळात सुमारे साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन डिसेंबर २०२२ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला. एक वर्षात काम पूर्ण करायचे असताना तब्बल तीन वर्षे उलटूनही योजना पूर्ण का झाली नाही? तसेच काम अपूर्ण असतानाही सुमारे अडीच कोटी रुपयांची बिले कोणत्या निकषांवर अदा करण्यात आली? कोणतेही ठोस व अधिकृत कारण नसताना ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ का देण्यात आली? तीन वर्षांनंतरही पाणी योजना पूर्ण होत नसेल तर जबाबदार कोण? ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न चेष्टा वाटली काय? टँकर व मिरी-तिसगाव योजनेतून होणारा पाणीपुरवठा हा तात्पुरता उपाय आहे. परंतु एवढा मोठा निधी मंजूर असताना कायमस्वरूपी उपाययोजना का होत नाहीत? संबंधित अधिकारी ठेकेदारांना पाठीशी घालत आहेत का? अशा कठोर शब्दांत तनपुरेंनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. तनपुरेंच्या प्रश्नांवर अधिकारी मात्र निरुत्तर झाल्याचे आंदोलनस्थळी दिसून आले.
यावेळी ठेकेदार कोणत्याही पक्षाचा असो, त्याला काळ्या यादीत टाका. व मिरी गावच्या पाणी प्रश्नाबाबत लेखी उत्तर दिल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही,” असा पवित्रा तनपुरे यांनी घेतला होता.

लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता जायभाय यांनी लेखी आश्वासन देत २० दिवसांत गावठाण हद्दीतील टाकी पूर्ण करून पाणीपुरवठा सुरू करण्याचे मान्य केले. उर्वरित तीन टाक्या ३० दिवसांत पूर्ण करण्याची अंतिम मुदत ठेकेदाराला देण्यात आली असून आठ दिवसांत काम सुरू न झाल्यास व मुदतीत पूर्ण न केल्यास ठेकेदारावर कारवाई केली जाईल, असे लेखी आश्वासनात नमूद करण्यात आले. सदर लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले; मात्र मुदतीनंतरही दिरंगाई झाल्यास पुन्हा रास्ता रोको करून संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर गुन्हे दाखल केल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा तनपुरेंनी दिला.

“कृत्रिम पाणीटंचाई निर्माण” – संतोष शिंदेंचे गंभीर आरोप
भाजपचे मंडळाध्यक्ष तथा माजी सरपंच संतोष शिंदे यांनी या आंदोलनात ग्रामस्थ म्हणून सहभागी होत ठेकेदार व अधिकाऱ्यांमुळे मिरीत कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याचा थेट आरोप केला. प्रमुख ठेकेदाराने स्वतःचा वाटा घेऊन प्रत्यक्ष काम स्थानिक ठेकेदाराकडे दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ग्रामपंचायत सदस्य असलेल्या त्यांच्या पत्नीची मान्यता नसताना देखील जाणीवपूर्वक ठरावावर नाव टाकून खोटा ठराव सादर करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी लेखी पुरावे सादर केले. जलजीवनच्या कामातील गैरव्यवहाराची चौकशी लावून देखील अहवाल जाहीर न केल्याचा आरोप करत या कामाची पारदर्शक चौकशी करून ठेकेदाराकडून झालेल्या नुकसानीची भरपाई करून घेण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच स्थानिक ठेकेदाराच्या विरोधात बोलणाऱ्यांना धमक्या देण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु मी धमक्यांना घाबरणार नाही; शेवटपर्यंत पाठपुरावा करणार, धमकी देणाऱ्यांना जशाच्या तशा भाषेत उत्तरे दिले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.

जेसीबी बिलांचा प्रश्न; ठेकेदाराने झटकली जबाबदारी
सुमारे दोन कोटी पेक्षा जास्त बिले मिळालेली असताना देखील या कामातील खोदाईसाठी वापरण्यात आलेल्या जेसीबी चालकांची बिले थकीत असल्याचा मुद्दा तीन जेसीबी चालकांनी प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होऊन उपस्थित केला.याबाबत उपस्थित असलेल्या मुख्य ठेकेदारास प्राजक्त तनपुरे यांनी विचारणा केली असता प्रत्यक्ष काम हे इतर स्थानिक ठेकेदाराकडे असल्याचे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याने जेसीबी चालकांचा संताप वाढला. याबाबत मुख्य ठेकेदारांनी स्थानिक ठेकेदाराकडून बिले मिळवून द्यावीत अशा सूचना तनपुरे यांनी मुख्य कंत्राटदारास केल्या आहेत.
शासकीय टँकरची मागणी; प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद
जोपर्यंत योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवावा, अशा सूचना तनपुरेंनी तहसीलदारांना दिल्या. ग्रामपंचायतीमार्फत प्रस्ताव पाठवून वरिष्ठ कार्यालयाकडे सकारात्मक निर्णयासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे नायब तहसीलदार सानप यांनी स्पष्ट केले.

सर्वपक्षीय एकजूट; राजकीय चर्चेला उधाण
आंदोलनात संतोष शिंदे, भागिनाथ गवळी, डॉ. बबनराव नरसाळे, एकनाथ झाडे, राजू मामा तागड, विजय गवळी, महादेव कुटे, गिरधारी डहाळे, बापू मिरपगार, हरी दाणे आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी पोपटराव गवळी, माणिक गवळी, नारायण सोलाट, नामदेव दारकुंडे, बंडू झाडे, नंदराज कुटे, राजू शेख, मच्छिंद्र दारकुंडे, संभाजी दारकुंडे यांच्यासह सर्वपक्षीय नेते व ग्रामस्थ प्रचंड मोठा संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात ग्रामस्थ म्हणून भाजपचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.








