नऊ वर्षांच्या उपेक्षेनंतरही भाजपाशी एकनिष्ठ
मिरीतील पत्रकार सन्मान सोहळ्यात विजयकुमार कोरडे यांचे जि.प. उमेदवारीचे संकेत

सचिन नन्नवरे
मिरी: पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार कोरडे यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त रविवारी मिरी–करंजी गटातील पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त उपस्थित पत्रकारांचा यथोचित सन्मान करून त्यांना आकर्षक व उपयुक्त भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना विजयकुमार कोरडे यांनी आपल्या प्रशासकीय, राजकीय व सामाजिक जीवनातील आठवणींना उजाळा दिला. प्रशासकीय सेवेत कार्यरत असतानाच मिरी–करंजी गटात विविध सामाजिक उपक्रम राबवून आपण योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले. राजकीय क्षेत्रात सुरुवातीपासूनच आपण भारतीय जनता पार्टीशी निष्ठेने जोडलेले असून, सामाजिक कार्याच्या बळावर मागील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारीची मागणी केली होती, असे त्यांनी नमूद केले. व तत्कालीन पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमातून उमेदवारी निश्चित देखील झाली होती; मात्र ऐनवेळी उमेदवारी डावलून दुसऱ्या उमेदवारास संधी देण्यात आले असल्याची खंत विजयकुमार कोरडे यांनी यावेळी बोलून दाखवली.
त्यावेळी झालेल्या निवडणुकीच्या निकालाचे राजकीय दृष्ट्या विश्लेषण केले असता असे निदर्शनास येते की, गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपाची सत्ता असताना देखील मिरी–करंजी गटात भाजपाच्या उमेदवाराचा तिसऱ्या क्रमांकाची मते घेऊन लाजिरवाणा पराभव झाला होता. त्यामुळे त्या वेळी विजयकुमार कोरडे यांना डावलून दुसऱ्या उमेदवाराला उमेदवारी देऊन पक्ष नेतृत्वाकडून चूक झाली होती का, याचे आत्मपरीक्षण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना यावेळी करावे लागणार आहे.
मागील निवडणुकीत पक्षाकडून डावलले गेले असताना देखील विजयकुमार कोरडे यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून यावेळेस पुन्हा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, पाथर्डी–शेवगावच्या आमदार मोनिकाताई राजळे तसेच जिल्हा बँकेचे संचालक युवा नेते अक्षयदादा कर्डिले यांच्याकडे अधिकृत उमेदवारीबाबत मागणी केल्याचे सांगितले. तसेच गेल्या नऊ वर्षांपासून पक्षाने उपेक्षित ठेवून देखील कोणतीही नाराजी व्यक्त न करता आपण आजतागायत निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पक्षासोबतच कार्यरत असून भविष्यात देखील पक्षासोबतच राहू असे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, आतापर्यंत केलेला संघर्ष, मागील वेळी उमेदवारी निश्चित झाल्यानंतर प्रशासकीय सेवेचा दिलेला राजीनामा आणि त्यानंतर झालेली उपेक्षा या सर्व बाबींचा विचार करून यावेळी पक्षाने सुशिक्षित व सक्षम युवा चेहरा म्हणून उदयास येत असलेल्या डॉ. साक्षी विजयकुमार कोरडे यांना अधिकृत उमेदवारी द्यावी.” अशी इच्छा व्यक्त केली. या मागणीवर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भूमिका काय राहते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नऊ वर्षांच्या संघर्षानंतरही यावेळी पक्षाकडून पुन्हा डावलले गेल्यास विजय कोरडे कोणती भूमिका घेतात, हे देखील पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, या पत्रकार सन्मान सोहळ्यात तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास मुखेकर, सचिन नन्नवरे, ज्येष्ठ पत्रकार अशोक मोरे, तुळशीदास मुखेकर, चंद्रकांत गायकवाड, रमेश पाथरकर, सुनील नजन, अंबादास गोरे, संतोष नन्नवरे व वजीर शेख आदी पत्रकार उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ नेते राजू मामा तागड, सामाजिक कार्यकर्ते डॉ. बबनराव नरसाळे, गणेश मोटे, एकनाथ झाडे, राजेंद्र नेते गवळी, अफसर शेख मेजर, रमेश डफळ, गोरख झाडे, अशोक घोंगडे, शुभम मोटे, डॉ.विजय वेताळ, सुनील औताडे, सुनील कोरडे आदी उपस्थित होते.







