महायुतीकडून उमेदवारी मिळाल्यास निवडणूक लढवणार
पत्रकार सन्मान सोहळ्यात डॉ. नंदकिशोर नरसाळेंची राजकीय भूमिका स्पष्ट

सचिन नन्नवरे
मिरी: पत्रकार दिनाचे औचित्य साधून मिरी येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच वैद्यकीय व्यवसायासह, हॉटेल व उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते डॉ.नंदकिशोर बबनराव नरसाळे यांनी मिरी–करंजी गटातील पत्रकारांचा यथोचित सन्मान केला. यावेळी नरसाळे कुटुंबीयांच्या वतीने उपस्थित पत्रकारांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमानंतर झालेल्या औपचारिक चर्चेमध्ये डॉ. नरसाळे यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. मतदानाचा हक्क प्राप्त झाल्यापासून आपण हिंदुत्वाच्या विचाराशी बांधील असून आजपर्यंत फक्त भारतीय जनता पार्टी व महायुतीतील घटक पक्षांनाच मतदान केले आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या घटक पक्षांकडून उमेदवारीसाठी विचारणा झाल्यास आपण संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत डॉ.नरसाळे यांनी दिले आहेत.
तसेच पुढे बोलताना डॉ.नंदकिशोर नरसाळे यांनी सांगितले की, गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीचे व महायुतीचे सरकार असताना देखील मागील निवडणुकीत मिरी जिल्हा परिषद गटात भाजपाचा उमेदवार निवडून येऊ शकला नाही. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी यावेळी सर्व बाबींचा विचार करून नवीन युवा, सुशिक्षित व जनाधार असलेल्या सक्षम उमेदवारालाच संधी द्यावी असे मत व्यक्त केले.
यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये डॉ. नरसाळे हे आपल्या पत्नीला जिल्हा परिषद मिरी गटातून निवडणूकीच्या रिंगणात उतरविण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डॉ.नरसाळे यांच्याकडे भाजपाचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून बघितले जाते. तसेच त्यांचे माजी खासदार सुजय विखे पाटील, पाथर्डी शेवगावच्या आमदार मोनिकाताई राजळे यांच्याशीही घनिष्ठ सबंध आहेत. असे असले तरी देखील नरसाळे कुटुंबीयांचे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्याशी व अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांच्याशी देखील कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे डॉ.नरसाळे हे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते असले तरी ऐनवेळी महायुतीतील कोणत्या घटक पक्षाकडून उमेदवारी स्वीकारणार, याबाबत त्यांनी अद्याप स्पष्ट भूमिका जाहीर केली नसल्याने त्यांचा पक्ष कोणता राहील, हे सध्यातरी गुलदस्त्यात आहे.

यावेळी पाथर्डी तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास मुखेकर, ज्येष्ठ पत्रकार अशोक मोरे, तुळशीदास मुखेकर, सचिन नन्नवरे, सुनील नजन, रमेश पाथरकर, भिवसेन टेमकर, अंबादास गोरे, वजीर शेख व संतोष नन्नवरे आदी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.







