कर्डिले साहेबांच्या जनसेवेचा वारसा यापुढे अक्षयदादा चालवतील — पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मिरी: सचिन नन्नवरे, 📞 8888770819
दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या जनसेवेच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार पाथर्डी तालुक्यातील ३९ गावांतील भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला. या निर्धार मेळाव्याचे आयोजन चिचोंडी येथे करण्यात आले होते.
या मेळाव्यास राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार संग्राम जगताप, तसेच युवा नेते अक्षयदादा कर्डिले हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, ज्यांना भामटेपणा करायचा ते करतीलच; पण आम्ही जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत.या भागात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या सर्व बंधाऱ्यांची पुढील पावसाळ्यापर्यंत दुरुस्ती पूर्ण केली जाईल, मुळा धरणातील गाळ काढून व धरणाची उंची वाढवून पाणी पातळी वाढवली जाईल, त्याचबरोबर धरणावर तरंगणारे सोलर बसवून वीजबिलाची कायमची सुटका केली जाईल व वांबोरी चारीचा व्हॉल्व आणखी खाली घेण्यासह बूस्टर पंप बसवून पाझर तलावांना पुरेसे पाणी दिले जाईल असे आश्वासन मंत्री विखे यांनी यावेळी दिले.
“कर्डिले साहेबांच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही ” — आमदार मोनिका राजळे

या वेळी बोलताना आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या की, “कर्डिले साहेबांचा जनसेवेचा वारसा अक्षयदादा निश्चितच पुढे सुरू ठेवतील. आम्ही त्यांना सर्वतोपरी सहकार्य करू आणि कर्डिले साहेबांच्या कार्यकर्त्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही.” यासह आमदार राजळे यांनी वांबोरी चारी योजनेचे फेरसर्वेक्षण करावे तसेच पूरग्रस्त बंधाऱ्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी विनंती पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडे केली.
“कार्यकर्त्यांना साहेबांची उणीव भासू न देण्याचा प्रयत्न करीन” — अक्षय कर्डिले

दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षयदादा कर्डिले यांना भावना व्यक्त करताना कंठ दाटून आला. ते म्हणाले, “असा दिवस येईल असं वाटलं नव्हतं… आजही वाटतं की साहेब येतील. त्यांनी आजारपणातही जनतेचीच काळजी घेतली. माझ्या वेळेपेक्षा त्यांनी जनतेला अधिक वेळ दिला.आज एवढा जनसमुदाय पाहून विश्वास वाटतो की त्यांच्या कार्याची छत्रछाया माझ्यावर आहे. विखे, राजळे, जगताप ही सर्व ज्येष्ठ मंडळी माझे मार्गदर्शक आहेत. मी कार्यकर्त्यांशी अंतर ठेवणार नाही आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होईन. ‘साहेब नसतानाही जनता दरबार अविरत सुरू राहील,’ हा माझा शब्द आहे.”
“अक्षयदादांच्या मागे खंबीरपणे उभे राहा — तीच खरी श्रद्धांजली” : सुजय विखे पाटील

माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी भाषणात कार्यकर्त्यांना समज देत वातावरणात हास्य फुलवले. ते म्हणाले, “कर्डिले साहेब कामाचा माणूस होते. ज्यांनी या भागाला पाणी आणले, तो माणूस आज आपल्या मध्ये नाही. त्यांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल, तर येणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत तन-मन-धनाने अक्षयदादांच्या मागे उभे राहा. मी एवढी कामे करूनही लोकांनी मते दिली नाहीत, विद्यमान खासदारांनी तर एकदाही येऊन विचारपूस केली नाही. काम करणारा माणूस विसरला जातो, म्हणूनच आता कार्यकर्त्यांनी एकनिष्ठ राहायला हवे.”
वांबोरी चारीचे नामांतर करण्याची मागणी करणार – डॉ.सुजय विखे पाटील
पाथर्डी तालुक्याच्या विकासासाठी वरदान ठरलेल्या वांबोरी चारी योजनेचे नाव या योजनेसाठी सतत पाठपुरावा करणारे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या नावावरून ‘आमदार शिवाजीराव कर्डिले वांबोरी चारी योजना’ असे करण्यात यावे, अशी आग्रही मागणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे वक्तव्य माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केले आहे. त्यामुळे लवकरच हे नामांतर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वांबोरी चारी टप्पा एकच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ

या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुमारे १४ कोटी रुपयांच्या खर्चाच्या वांबोरी चारी टप्पा एकच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने करण्यात आला. त्यानंतर मंत्री विखे यांनी सदर कामाची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतली. या प्रसंगी पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी माझी सभापती संभाजीराव पालवे व काशिनाथ पाटील लवांडे यांनी मंत्री विखे यांच्याकडे मागणी केली की वांबोरी चारी मधून वंचित राहिलेले गावांचा देखील या योजनेत समावेश करावा व वांबोरी चारी टप्पा एक मधील गावांना अधिक पूर्ण दाबाने पाणी मिळावे यासाठी बुस्टर पंप बसविण्याची गरज असल्याचे मंत्री विखे यांच्या लक्षात आणून दिले. त्यावर मंत्री विखे यांनी देखील आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख करत सकारात्मक प्रतिसाद दिला.
जनतेचा विश्वास कर्डिले कुटुंबाच्या सोबत
या मेळाव्यातून पुन्हा एकदा हे स्पष्ट झाले की, दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे जनसेवेचे कार्य आजही जनतेच्या मनात जिवंत आहे आणि तोच विश्वास त्यांच्या सुपुत्र अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. यावेळी दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या जीवनकार्यावर आधारित भावनिक चित्रफित दाखवण्यात आली, ज्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना गहिवरून आले.
या कार्यक्रमाला माजी सभापती संभाजीराव पालवे, काशिनाथ पाटील लवांडे, मिर्झारजी मणियार, माजी जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम आठरे, जिल्हा परिषद कामगार युनियन सोसायटीचे माजी अध्यक्ष विजयकुमार कोरडे, बाजार समितीचे सभापती सुभाष बर्डे, संचालक वैभवशेठ खलाटे, जिजाबा लोंढे, खरेदी विक्री संघाचे संचालक पोपटराव कराळे, मिरी–तिसगाव नळ योजनेचे अध्यक्ष एकनाथ आटकर, भाजप मंडलाध्यक्ष संतोष शिंदे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. नंदकिशोर नरसाळे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष महेश अंगारखे, वृध्देश्वर कारखान्याचे संचालक चारूदत्त वाघ, सरपंच श्रीकांत आटकर, बाबाजी पालवे, माजी उपसरपंच आण्णा पाटील शिंदे, संजय शिंदे, ज्येष्ठ नेते कारभारी गवळी, राजु मामा तागड, माजी उपसभापती महादेव कुटे, जय हिंद सैनिक फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे (मेजर), शिवाजी वेताळ (मेजर), सुनील साखरे, दीपक लांडगे, रामेश्वर फसले, संभाजी सोलाट आदींसह तालुक्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनीच आगामी विधानसभा पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिलेंनाच आमदार करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.







