मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील मुंबईकडे रवाना
मिरीसह गावोगावी स्वागताची जय्यत तयारी

मिरी: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आंदोलनासाठी अंतरवली येथून मुंबईकडे रवाना झाले असून, या आंदोलनाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गावोगावी त्यांचे स्वागत होत असल्याने नियोजित वेळापत्रकात बदल होऊन वाहनांच्या वर्दळीमुळे मोर्चा संथ गतीने आगेकूच करत आहे.
सकाळपासून मिरी येथे मराठा बांधवांनी स्वागताची जय्यत तयारी सुरू केली होती परंतु दिवसभर थांबून देखील जरांगे पाटील यांचा ताफा हा पैठण पर्यंत आल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे मिरी येथे पोहोचण्यास किमान रात्रीचे नऊ वाजतील असा अंदाज बांधला जात होता. तरी देखील मराठा बांधव रस्त्यावर ठाण मांडून बसलेले होते.
या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मराठा बांधव दुचाकी, चारचाकी तसेच मालवाहतूक ट्रकसह इतर विविध वाहनांच्या माध्यमातून समूहाने प्रवास करत असून प्रत्येक वाहनाला भगवे झेंडे आणि जरांगे पाटील यांचे छायाचित्र असलेले झेंडे लावलेले दिसत होते.

मिरी येथे जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जेसीबीने पुष्पवृष्टी करण्याची तयारी करण्यात आली होती. तसेच येणाऱ्या मराठा बांधवांसाठी चहा व नाश्त्याची सोय स्थानिक स्तरावर करण्यात आली होती. मोर्चामुळे शेवगाव–मिरी–पांढरीपूल या मार्गावर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ जाणवत होती.
संपूर्ण मार्गावर मराठा बांधव उत्साहाने सामील होत असून, आंदोलनाला व्यापक जनसमर्थन लाभत असल्याचे स्पष्ट होत आहे.







