शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी स्वच्छता महत्वाची- डॉ. मनिषा खेडकर
आव्हाड महाविद्यालयातर्फे उपजिल्हा रुग्णालय स्वच्छता मोहीम
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
स्वच्छता ही सर्वात महत्वाची सवय असून स्वच्छता आणि आरोग्य एकमेकांशी जोडलेले आहेत. जर व्यक्ती स्वच्छ असेल तर ती अनेक संसर्गजन्य आजारांशी लढू शकते आणि त्यांना रोखू शकते, स्वच्छता तुमचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य वाढवते, असे प्रतिपादन येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा खेडकर यांनी केले.
त्या बाबुजी आव्हाड कनिष्ठ महाविद्यालयातर्फे उपजिल्हा रुग्णालयामध्ये आयोजित स्वच्छता मोहीम प्रसंगी बोलत होत्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन चौरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन दरंदले, डॉ. प्रल्हाद बडे, डॉ. कांबळे, आदिनाथ भोईटे, डॉ. रवींद्र भोईटे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेखा चेमटे उपस्थित होते.
डॉ. खेडकर म्हणाल्या, स्वच्छतेचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतोच, शिवाय देशाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठीही ती महत्त्वाची आहे. स्वच्छतेचे महत्त्व समजून घेतले पाहिजे आणि आजारांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी मूलभूत उपायांचा अवलंब केला पाहिजे. परिसर स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. परिसर स्वच्छ ठेवणे ही गोष्ट वैयक्तिक व सामूहिक दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. या परिसराचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. परिसर स्वच्छ ठेवणे ही सामूहिक जबाबदारी आहे. परिसर स्वच्छता एकदाच करून भागणारी गोष्ट नाही तर सतत चालणारी प्रक्रिया आहे, अशा त्या शेवटी म्हणाल्या.
बाबूजी आव्हाड कनिष्ठ महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना (+२ स्तर) विभागाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्लास्टिक, कचरा, अनावश्यक वाढलेली झुडपे, गजर गवत यांची विल्हेवाट करण्यात आली तसेच रुग्णालयाच्या आवारात असणाऱ्या झाडांना आळे करून तेथील स्वच्छता करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त श्रमदान केले. पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या प्रेरणेने ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
पर्यवेक्षक प्रा. सलीम शेख, प्रा. शेखर ससाणे, प्रा. सुनिल कचरे, प्रा. महारुद्र घुले, प्रा. खंडेराव डोईफोडे, प्रा. मन्सूर शेख, प्रा. माया पवार, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेखा चेमटे यांनी स्वच्छता मोहिमेचे नियोजन केले.