राजळे महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना अभिवादन
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
येथील दादापाटील राजळे महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील प्रा. दुर्गा भराट, वाणिज्य शाखेतील प्रा. रामेश्वरी सरोदे व इतिहास विभागातील प्रा. आसाराम देसाई यांनी सावित्रीबाई फुले यांचे जीवन व कार्य यावर आपले मनोगत व्यक्त केले. सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाची पायाभरणी केली. त्यामुळे आमच्यासारख्या मुली शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकू शकल्या आणि जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे वाटचाल करू शकल्या, असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.जे. टेमकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. प्रचंड यातना सहन करूनही सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली शाळा सुरू केली.स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली केल्यामुळेच आज विविध क्षेत्रांमध्ये स्त्रिया चमकत आहेत. सावित्रीबाईंच्या विचाराचा वारसा सर्वांनी पुढे चालवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. राजू घोलप यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याचा परिचय करून दिला. केशवपन आणि बालविवाह यांसारख्या जाचक प्रथांवर देखील सावित्रीबाई फुले यांनी हल्ला चढविला व अशा अनिष्ठ सामाजिक रूढी पूर्णपणे बंद करण्यात मोलाचे योगदान दिले, असे मत व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप केला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व विद्याशाखाप्रमुख डॉ. एम. एस. तांबोळी, डॉ. जे. एन. नेहुल, डॉ. एस. जे. देशमुख, प्रा. सी. एन. पानसरे व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किशोर गायकवाड यांनी केले.