दारू बंदी करून दारूची दुकाने गावाबाहेर काढा
महिला ग्रामसभेत महिलांचा आक्रोश
करंजी (अशोक मोरे): येथील बसस्थानकावर असलेले “देशी दारुचे दुकान हटवा, दारु बंदी झालीच पाहिजे” असा आक्रोश महिलांनी आज महिला दिनाचे औचित्य साधुन येथील उत्तरेश्वराच्या मंदिरातील सभागृहात महिलांनी आयोजित केलेल्या ग्रामसभेत केला. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच नसीमताई शेख होत्या.

नगर-पाथर्डी महामार्गावर पाथर्डी तालुक्यातील करंजीचा महत्वाचा थांबा समजला जातो. लांब-लांबचे प्रवाशी या ठिकाणी थांबतात. परंतु या बसस्थानकावरच देशी दारूचे दुकान असल्याने सकाळपासुनच झिंगणारांची संख्या जास्त असते. याचा मोठा त्रास बसस्थानकावरील महिला, व्यावसायिक, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थीना व प्रवाशांना होतो. आज महिला दिनाचे औचित्य साधुन महिलांनी येथील उत्तरेश्वराच्या सभागृहात ग्रामसभा आयोजित केली होती.

या ग्रामसभेत बसस्थानकावरील देशी दारुचे दुकान गावापासुन दोन किलोमीटर लांब हटविण्याची एकमुखी मागणी केली. यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. सरपंच नसीमताई शेख यांनी हा ठराव ग्रामसभेत मांडताच महिलांनी त्यास एकमुखी पाठिंबा जाहीर केला. स्टॅण्ड परिसरात मध्यावर असलेले देशी दारूचे दुकान गावाबाहेर हटविण्याची विरोधी सदस्यांनी जोरदार मागणी केली होती. हे दुकान गावाबाहेर घालविण्यासाठी विरोधी सदस्यांनी उपोषणही केले होते. यावेळी अनेक महिलांनी आपले मत मांडुन हे देशी दारुचे दुकान गावाबाहेर घालविण्याची मागणी केली. या ग्रामसभेला मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ हजर होते.

करंजी येथील बसस्थानकावरील देशी दारुचे दुकान पंधरा वर्षापुर्वीच हटविण्यात यायला पाहिजे होते. या रस्त्यावरुन जाणाऱ्या विद्यार्थीनी, महिला, व्यावसायिक यांना होणारा त्रास टळला असता, परंतु हा ठराव माझ्या काळात होतोय हे माझे भाग्य आहे – सौ. नसीमताई शेख (सरपंच करंजी)