प्रत्येकाला स्वत:ची किंमत ओळखता यायला हवी-डॉ. संजीवनी तडेगावकर
बाबूजी आव्हाड महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
माणूस स्वत:च्या क्षमता वेळीच ओळखत नसल्यामुळे तो आयुष्याच्या शेवटपर्यंत परिस्थितीशी तडजोड करत राहतो. स्वक्षमता ओळखणे हीच खरी आनंदाची गुरुकिल्ली असून परिस्थितीवर मात करणारी माणसे आयुष्यात खूप मोठी होतात म्हणून प्रत्येकाला स्वत:ची किंमत ओळखता यायला हवी, असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक व कवयित्री डॉ. संजीवनी तडेगावकर यांनी केले. त्या येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड तर व्यासपीठावर उपाध्यक्ष एड. सुरेशराव आव्हाड, विश्वस्थ महावीर मुनोत, दिलीपराव गर्जे, प्राचार्य डॉ. बबन चौरे, पंडितराव तडेगावकर, मुख्यध्यापक शरद मेढे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विजय देशमुख, शाहीर भारत गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. तडेगावकर पुढे म्हणाल्या, प्रत्येक व्यक्तीला कमी वेळेत कमी श्रमात यशस्वी व्हायचे असेल तर त्याला योग्य मार्गदर्शकाची गरज असते. मार्गदर्शक हा जीवनाच्या प्रवासात खूप महत्वाचा घटक आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात सामाजिक, आर्थिक, वातावरणीय, कौटुंबिक यापैकी कोणतातरी संघर्ष येतोच. या संघर्षातून स्वतः वाट काढत असताना चांगले गुरु आपल्या आयुष्याचे सोने करतात. प्रत्येक मुलाला आज स्वतःबद्दल गंभीर होण्याची गरज असून प्रत्येक पालकाने पालकत्वाबाबतचे दोष वेळीच ओळखून आपल्या पाल्याला सुसंस्काराची जाणीव करून देणे गरजेचे आहे.मुलींसाठी निर्माण होणारी संकटे आपणच निर्माण करत असून नकळत घडणारी एक चूक मुलींचे आयुष्य खराब करू शकते म्हणून प्रत्येक मुलीने आपल्या पालकांची मान शरमेने खाली जाईल अशी कोणतीही गोष्ट करू नये. उच्च शिक्षण घेईपर्यंत मुलींची संख्या कमालीच घटत आहे, ही आपणा सर्वांसाठी शरमेची गोष्ट आहे.कवी मन हे अस्वस्थ आत्म्यासारखे असून समाजात सतत काहीतरी चांगले घडावे अशी प्रत्येक कविमनाची इच्छा असते. जगण्यातून आलेल्या अनुभवाचा अर्क म्हणजे कविता होय. बाबुजी आव्हाड महाविद्यालयाने क्रीडा तसेच इतर सर्व क्षेत्रात अतिशय अतुलनीय कामगिरी केली असून याचे सर्व श्रेय या माळरानावर ज्ञानाचा वटवृक्ष उभा करणाऱ्या स्व. बाबूजींना जाते. या कामगिरीत अभय आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तरोत्तर प्रगती होत जावो, अशी सदिस्छा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील क्रीडा, सांस्कृतिक तसेच अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व वार्षिक अहवाल वाचन प्राचार्य डॉ. बबन चौरे, पाहुण्यांचा परिचय डॉ. अशोक कानडे, सुत्रसंचालन डॉ. अभिमन्यू ढोरमारे, डॉ. विजय देशमुख, प्रा. सचिन शिरसाट, डॉ. अशोक डोळस तर आभार प्रा. मन्सूर शेख यांनी मानले.
कार्यक्रमाची सुरुवात शाहीर भारत गाडेकर यांच्या महाराष्ट्र गीताने तर सांगता पसायदानाने झाली.