विद्यार्थ्यांच्या अदाकारींनी बहरले जि. प. मिरी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन
मिरी : जि. प. प्राथमिक शाळा मिरीचे वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या नृत्य, नाट्य आणि सांस्कृतिक सादरीकरणामुळे अविस्मरणीय ठरले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध मराठी व हिंदी गीतांवर सादर केलेल्या नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. तसेच विविध विनोदी व सामाजिक नाटिकांनी रसिक प्रेक्षकांना अंतर्मुख केले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेने व अभिनयाने भारावून जाऊन उपस्थित प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांवर शालेय उपयोगी वस्तूंच्या स्वरूपात व रोख रकमेच्या स्वरूपात प्रोत्साहनपर बक्षीसांचा वर्षाव केला.
या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने केंद्रपातळीपासून राज्यपातळीपर्यंत शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात मिरी शाळेचे नाव उज्ज्वल करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा देखील सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच सुनंदा गवळी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुभाष गवळी, राजेंद्र गवळी, मुख्याध्यापक निलेश शिरसागर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, सेवा संस्थेचे पदाधिकारी, शाळेतील सर्व शिक्षक व पालकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.