अतिक्रमण : एकीकडून निघाले अन् दुसरीकडे पुन्हा झाले

मिरी: संपूर्ण जिल्ह्यात प्रशासनाकडून रस्त्याचे कडेचे अतिक्रमण हटविण्यात येत आहे त्या अनुषंगाने पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील रस्त्याच्या कडेचे अतिक्रमण अटविण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अतिक्रमण धारकांना नोटीसा देण्यात आल्या असून संबंधितांनी आपले अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
त्या अनुषंगाने संबंधित अतिक्रमण धारकांनी रस्त्याच्या कडेला असलेले आपले अतिक्रमण स्वतःहून काढण्याचे काम हाती घेतले आहे. परंतु त्याचवेळी यातील बहुतांशी व्यवसायिकांनी रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण काढून बाजारतळावर मोकळ्या जागेत पत्र्याचे शेड व टपऱ्या मांडून पुन्हा अतिक्रमण केले आहे. त्यामुळे अतिक्रमण एकीकडे निघाले व दुसरीकडे पुन्हा झाले असे म्हणायची वेळ आली आहे. त्यामुळे मिरी येथील अतिक्रमणाचा प्रश्न जैसे थे राहण्याची शक्यता आहे.
बाजार तळावर आठवडे बाजार भरविला जातो परंतु त्याच जागेवर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले असल्याने आठवडे बाजार आता कुठे भरणार हा गंभीर प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.
तसेच याच ठिकाणी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा देखील असल्याने अतिक्रमणामुळे गजबज वाढण्याची शक्यता आहे व त्याचा त्रास जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन यावरती काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
बाजार तळावर झालेल्या अतिक्रमणासंदर्भात माहिती घेतली असून त्या संदर्भात कुणाची लेखी तक्रार प्राप्त झाल्यास वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून व्यावसायिक व ग्रामस्थांच्या दृष्टीने विचार करून योग्य तो हिताचा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल
– सुनंदा राहुल गवळी (सरपंच, ग्रामपंचायत मिरी)
ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने अतिक्रमणासंदर्भात विचार करून विस्थापित व्यवसायिकांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात सकारात्मक पावले उचलावीत त्यास सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.
– संतोष शिंदे (माजी सरपंच)
मिरी ग्रामपंचायतीने केला होता व्यापारी संकुल बांधण्याचा प्रयत्न
मिरी येथील वाढत्या व्यावसायिकांच्या संख्येचा विचार करून मिरी ग्रामपंचायतीच्या वतीने सुमारे ९० लक्ष रुपये खर्चाच्या भव्य ३६ गाळ्यांच्या दुमजली व्यापारी संकुलाच्या बांधकामाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.त्या अनुषंगाने सुमारे ५० लाखांचे कर्ज देखील मंजूर करण्यात आले होते. परंतु त्यावेळी संबंधित व्यवसायिकांनी अपेक्षित प्रतिसाद न दिल्याने व आवश्यक अनामत रक्कम जमा न केल्यानेच व्यापारी संकुल होऊ शकले नाही. तसेच पुढील काळात शासनाच्या काही निर्णयामुळे देखील व्यापारी संकुल उभारण्यास अडचणी आल्या असल्याची माहिती ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली आहे.