मिरी येथील कानिफनाथ देवस्थान परिसरात खोदकाम दरम्यान सापडली पुरातन गणेश मूर्ती
अहिल्यानगर: पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील श्री चैतन्य कानिफनाथ देवस्थानच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असून यावेळी सुरू असलेल्या खोदकामा दरम्यान या ठिकाणी श्री गणेशाची पुरातन कोरीव काम असलेली दगडी मूर्ती भंगलेल्या स्थितीत आढळून आली आहे
आज सकाळी देवस्थान परिसरात खोदकाम सुरू असताना, एका ठिकाणी काहीतरी कठीण वस्तू असल्याचे लक्षात आले. जेव्हा अधिक खोलवर खोदले गेले, तेव्हा भगवान श्री गणेशाची एक प्राचीन मूर्ती भंगलेल्या अवस्थेत आढळली. ही घटना समजताच परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिक जमले होते.
गेल्या अनेक वर्षांपासून मिरी येथील कानिफनाथ मंदिरावरून दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण होऊन अनेक वेळा संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या संघर्षामुळेच या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. परंतु नवीन विश्वस्त मंडळ स्थापन झाल्यानंतर या ठिकाणी जुने मंदिर पाडून नवीन हिंदू हेमाडपंथी पद्धतीचे दगडी बांधकाम असलेले भव्य मंदिर उभारण्याचे काम सुरू आहे. या कामादरम्यान आतापर्यंत अनेक वेळा विविध देवी देवतांच्या पुरातन मुर्त्या उत्खननात आढळून आल्या असून मूर्ती अभ्यासकांनी देखील या मुर्त्या पुरातन असल्याचे स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी पूर्वी हिंदू मंदिराचेच अस्तित्व असल्याचे अधोरेखीत होत आहे.