अवघ्या चारशे रुपयात मिळाली दोन लाखांची मदत
प्रतिनिधी, सोमराज बडे :
केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवते. यामध्ये विविध प्रकारच्या योजनांचा समावेश करण्यात आला आहे. जी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या हिताची काळजी घेते. त्यामुळे लोकांना आर्थिक लाभ देण्यासाठी काही योजना चालवल्या जातात.
याचाच भाग असलेली योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत जोगेवाडी येथील शेतकरी दाम्पत्य सीताराम सारुक व हौसाबाई सारूक यांना दोन लाख रुपयांचा लाभ बँक ऑफ महाराष्ट्रा शाखा चिंचपूर पांगुळ च्या माध्यमातून नुकताच देण्यात आला.
सविस्तर माहिती अशी की,काही दिवसांपूर्वी सारूक दांपत्य यांचा मुलगा अक्षय सीताराम सारूक याचे अपघाती निधन झाले होते.अक्षय सारूक यांनी एस.डी. बडे (बँक ग्राहक सेवा केंद्र) यांच्या माध्यमातून बँक ऑफ महाराष्ट्रच्या चिंचपूर पांगुळ शाखेत बचत खाते उघडून दूरदृष्टी ठेवत प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना (वार्षिक ४३६रू.हप्ता ) काढून ठेवला होता.त्यामुळे विमेधारकाचा मृत्यू झाल्यास नियमानुसार मृताच्या वारसास नुकसान भरपाई म्हणून दोन लाखाची नुकसान भरपाई मिळते. याअंतर्गत अक्षय यांच्या वारस असलेल्या आई-वडील यांना बँकेचे मुख्य शाखाधिकारी श्री राजीव कुमार यांनी नुकतीच सर्व प्रकारच्या कायदेशीर बाबीचीं पूर्तता करत सदर रक्कम हस्तांतरित केली. याकामी बँकेचे शाखाधिकारी राजीव कुमार,उपशाखाधिकारी भूषण ढेंभरे, रोखपाल मनोज वणारसे,कृष्णा गरड,बाबासाहेब उदमले, बडे एस.डी, मुकुंद आघाव,यांनी सदर कामी योग्य ते मार्गदर्शन केले.
“सध्याच्या धकाधकीच्या जीवनात भविष्यात कशी परिस्तिती निर्माण होईल, ते काही सांगता येत नाही, त्यामुळे प्रत्येक व्यक्तिने जीवन विमा संरक्षण करणे आवश्यक आहे.
किमान बँकेच्या माध्यमातून असलेले प्रधानमंत्री जिवन ज्योती योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना तरी प्रत्येक पात्र व्यक्तीने घेतल्या पाहिजेत.यासाठी आमचे ग्राहक सेवा केंद्र येथेही संपर्क साधु शकता.”
👉श्री राजीव कुमार (शाखाधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा चिंचपूर पांगुळ)
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना काय आहे?
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही एक अपघात विमा योजना आहे. त्याची सुरुवात २०१५ साली झाली. सामान्यतः, जेव्हा कोणी अपघाती विमा घेतो तेव्हा त्याचे प्रीमियम शुल्क खूप जास्त असते. पण पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेत वर्षाला फक्त ₹२० जमा करावे लागतात. या योजनेअंतर्गत, कोणत्याही प्रकारच्या अपघातामुळे मृत्यू झाल्यास, नामांकित व्यक्तीला २ लाख रुपयांपर्यंतची आर्थिक रक्कम दिली जाते.तर गंभीर दुखापत किंवा अपंगत्व आल्यास, १००००० ची रक्कम प्रदान केली जाते. त्याच प्रमाणे १८ते ५० वय असणाऱ्या व्यक्तीचा ४३६ रु.मध्ये कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास अतिरिक्त २ लाख रुपये सदर वारसास मिळतात.दोन्ही ही विम्याचा कालावधी हा १ वर्षाचा आहे. दरवर्षी त्याचे नूतनीकरण करावे लागते. त्याचा वार्षिक प्रीमियम १ जूनपूर्वी खात्यातून कापला जातो.
याचा कोण लाभ घेऊ शकतो?
गरीब आणि मागासवर्गीय लोकांना डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विमा सुरू केला होता. गरीब आणि मागासवर्गीय लोकांना कमी खर्चात विमा संरक्षण योजनेचा लाभ मिळवून देणे हा या योजनेचा उद्देश होता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. यासोबतच तो मागासवर्गीय किंवा गरीब वर्गातील असेल तरच यासाठी अर्ज करू शकतो. या विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय १८ ते ७० वर्षांच्या दरम्यान असावे. ज्या बँकेत ऑटो डेबिट सुविधा देखील सक्रिय आहे त्याच बँकेत खाते देखील असावे. योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या कोणत्याही बँकेत अथवा ग्राहक सेवा केंद्र जाऊन फॉर्म भरून विमा संरक्षण लागू करता येतो.