संकटकाळी केवळ आपण केलेले पुण्यकर्मच आपल्याला साथ देते – महंत बालकदास महाराज
महंत बालकदास महाराजांच्या किर्तनाने पौळाचीवाडी परिसर दणाणला…..!
शेवगाव प्रतिनिधी (इसाक शेख)
भगवंताचे जप आणि नामस्मरण केले तर मनाला आत्मिक समाधान लागते, त्यामुळे स्तुती करायची असेल तर भगवंताची करा कारण भागवतांच्या नामस्मरणात आणि जपात खूप ताकत आहे. कारण संकटकाळी केवळ आपण केलेले पुण्यकर्मच आपल्याला साथ देते, त्यामुळे कर्म चांगले करा कारण चांगले कर्म करणाऱ्यांना आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही. भगवंत व्यापक आहे, नामस्मरनाची भक्ती ही भगवान विष्णूला आवडते त्यामुळे भगवंताचे नामस्मरण करा एकाग्रचित्ताने भगवंतांचे नामस्मरण केल्यास भगवंतांची प्राप्ती करता येते. असे प्रतिपादन श्री. क्षेत्र संस्थान नारायणदास गडाचे मठाधिपती ह.भ.प. महंत बालकदास महाराज यांनी केले. गेवराई तालुक्यातील पौळाचीवाडी येथील श्री. अमृतेश्वर संस्थान या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त वैकुंठवासी गंगाधर महाराज पौळ यांच्या प्रेरणेने तसेच भागवताचार्य लिंबाजी महाराज मुळे यांच्या शुभहस्ते सुरू असलेल्या सात दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाच्या चौथ्या दिवसाच्या किर्तनरूपी सेवेतून शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील श्री. क्षेत्र संस्थान नारायणदास गडाचे मठाधिपती ह.भ.प. महंत बालकदास महाराज हे भाविकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी या सप्ताहमध्ये पंचक्रोशीतील भाविक भक्त, टाळकरी, माळकरी, सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.