धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी सभापती राम शिंदें सोबत सकारात्मक चर्चा

अहिल्यानगर : महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. नामदार राम शिंदे यांची धनगर आरक्षण कृती समितीचे सदस्य आणि मिरी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू मामा तागड यांनी मुंबई येथे नुकतीच भेट घेतली. या भेटीत धनगर आरक्षणाच्या मागणी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात असून प्रा.राम शिंदे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत यासंदर्भात लवकरच आवश्यक पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले असल्याची माहिती राजू मामा तागड यांनी दिली आहे.
यावेळी तागड यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या दीर्घकालीन मागणीवर प्रकाश टाकला. सध्या धनगर समाज हा भटक्या विमुक्त (एनटी) प्रवर्गात आरक्षित असल्याने या समाजावर मोठा अन्याय होत आहे.त्यामुळे या समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गामध्ये समावेश करण्याची समाजाची मागणी आहे.या मागणी साठी आतापर्यंत झालेल्या विविध आंदोलने,आमरण उपोषण तसेच शासनाकडून देण्यात आलेल्या आश्वासनांची सविस्तर माहिती तागड यांनी प्रा.शिंदे यांना दिली.
यावेळी सभापती राम शिंदे यांनी यासंदर्भात स्वतः विशेष लक्ष घालून शासन स्तरावर सकारात्मक पावले उचलले जातील असे आश्वासन दिले आहे.सभापती शिंदे हे स्वतः धनगर समाजाचे असून राज्याच्या सर्वोच्च संविधानिक पदावर विराजमान झाल्याने धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भातील आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.त्यामुळे धनगर समाजाला प्रा.शिंदे यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असून ते नक्कीच शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करतील अशी अपेक्षा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू मामा तागड यांनी व्यक्त केली आहे.
वांबोरी चारीच्या अनियमित होणाऱ्या पाणी पुरवठ्याकडेही वेधले लक्ष
वांबोरी चारी टप्पा दोन चे काम सुरू करण्यात आले असले तरी टप्पा एक मध्ये समाविष्ट असलेल्या पाझर तलावांनाच नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याची शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नसल्याची बाब तागड यांनी शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्या संदर्भात देखील संबंधित विभागाशी चर्चा करून माहिती घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या जातील असे आश्वासन सभापती राम शिंदे यांनी यावेळी दिले आहे.