वीस वर्षांनंतर माजी विद्यार्थी आणि शिक्षकांचे पुनर्मिलन; जुन्या आठवणींना उजाळा
मिरी: काळ कितीही पुढे गेला तरी शाळेच्या आठवणी मनातून पुसल्या जात नाहीत. याच भावनेतून पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज विद्यालयातील माजी विद्यार्थी आणि शिक्षक तब्बल वीस वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले. हा अनोखा सोहळा विद्यार्थ्यांसाठी केवळ जुन्या आठवणींना उजाळा देणाराच नव्हे तर शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस ठरला.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरवात झाली, त्यानंतर माजी विद्यार्थी संतोष नन्नवरे यांनी शिक्षकांचा परिचय करून दिला.यावेळी अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य नरवडे सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तत्कालीन शिक्षक वाघमारे सर, गर्जे सर, मचे सर, ढवळे सर, डोळसे सर, गुंड सर आणि वांढेकर सर आदी उपस्थित होते. उपस्थित शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यानी आपल्या प्रवासातील आव्हाने आणि यशोगाथा सांगितल्या. वेगवेगळ्या क्षेत्रांत स्थिरावलेल्या या विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या यशाचा गौरव केला आणि शिक्षकांविषयी आदर व्यक्त केला.तर शिक्षकांनी देखील आपल्या आठवणी सांगितल्या व विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील हा संवाद केवळ औपचारिक न राहता अत्यंत हृदयस्पर्शी ठरला.
या स्नेहमेळाव्यात रमेश भाकरे,संदीप सुरासे,जयदीप गवळी,संतोष नन्नवरे,गणेश शिंदे,इरफान इनामदार,दिलीप कोरडे, ज्ञानदेव वाव्हळ,नानासाहेब वेताळ,भाऊसाहेब काळे,सोमनाथ गायकवाड आदींसह बहुतांशी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.यावेळी अनेकांनी जुन्या आठवणीना उजाळा दिला.भविष्यात आपल्या शाळेतील कोणताही विद्यार्थी मोठ्या पदावर पोहोचला किंवा विशेष यश संपादन केले, तर त्याला शाळेत आमंत्रित करून सन्मानित करावे. यामुळे इतर विद्यार्थ्यांना देखील प्रेरणा मिळेल आणि शाळेचा लौकिक वृद्धिंगत होईल, अशी भावना कार्यक्रमाच्या शेवटी माजी विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आली. यावेळी उपस्थित प्रत्येकाच्या मनात समाधान आणि आनंदासह हा स्नेहमेळावा आठवणींमध्ये कायमचा कोरला गेल्याचे दिसून आले.