विद्यार्थिनींनी आत्मनिर्भर व स्वसंरक्षणक्षम असले पाहिजे- प्राचार्य डॉ.शेषराव पवार
श्री आनंद महाविद्यालयामध्ये निर्भय कन्या अभियान शिबिर
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
आजच्या या स्पर्धात्मक व आव्हानात्मक युगात विद्यार्थिनींनी आत्मनिर्भर, आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र व स्वसंरक्षणक्षम असले पाहिजे, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषराव पवार यांनी केले. विद्यार्थी कल्याण मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,पुणे व श्री आनंद महाविद्यालय पाथर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या अभियान शिबिर श्री आनंद महाविद्यालयामध्ये पार पडले.
या शिबिराचे अध्यक्ष डॉ.शेषराव पवार यांनी शिबिराची उपयुक्तता विद्यार्थिनींना सांगितली. ते म्हणाले की, महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना मिळेल त्या प्रत्येक गोष्टींतून विद्यार्थ्यांनी काहीतरी ज्ञान संपादन केले पाहिजे. हीच शिदोरी आयुष्यभराची पुंजी बनून राहते. आजची स्त्री ही आत्मनिर्भर होत आहे. त्या अनुषंगाने आपल्या महाविद्यालयात नेहमीच विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात निश्चित होतो.
निर्भय कन्या अभियान शिबिराचे पहिले पुष्प श्री अंबादास साठे, कराटे प्रशिक्षक यांनी गुंफले व विद्यार्थिनींना कराटेचे प्रशिक्षण दिले. त्यांनी व त्यांच्या विद्यार्थ्यांनी कराटेचे स्वसंरक्षणासाठी प्रात्यक्षिक दाखविले व सहभागी विद्यार्थिनींकडून करून घेतले. जर एखादी व्यक्ती मागून किंवा पुढून अकस्मात हल्ला करत असेल तर त्यापासून कसा बचाव करायचा इत्यादी साध्या साध्या गोष्टीतून त्यांनी स्वसंरक्षणाचे धडे दिले. तसेच कराटे मुळे शरीराची लवचिकता ,मनाची एकाग्रता व आत्मविश्वास कसा वाढतो याविषयी प्रदीर्घ मार्गदर्शन केले.
शिबिराचे दुसरे पुष्प बाबूजी आव्हाड महाविद्यालयातील प्राध्यापिका सुरेखा चेमटे यांनी महिला सबलीकरण या विषयावर गुंफले.आपल्या व्याख्यानात त्यांनी इतिहासातील तसेच पौराणिक महत्त्वाच्या स्त्रियांचे दाखले देत उदाहरणासहित महिला कशा बुद्धिमत्तेने आणि निर्णयक्षमतेने विकसित होत्या त्याचे विश्लेषण केले. स्त्री ही सक्षम आहेच ,आधुनिक काळामध्ये तिला आणखी सक्षम होण्याची गरज आहे,असे प्रतिपादन चेमटे यांनी केले.आपल्या ओघवत्या शैलीत त्यांनी विद्यार्थिनींना महिला सबलीकरण व त्याची गरज यावर सखोल मार्गदर्शन केले.
या शिबिरातील तिसरे पुष्प डॉ. जयश्री खेडकर यांनी महिला व्यक्तिमत्व विकास या विषयावर गुंफले. त्यांनी व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय, त्याची काय गरज आहे, ते आपल्याला प्रभावीपणाने कसे विकसित करता येते यावर उदाहरणासह मार्गदर्शन केले. एखाद्या व्यक्तीचे सौंदर्य त्यांच्या हातात जरी नसले तरी त्याला त्यांचे व्यक्तिमत्व प्रभावी पणे कसे खुलवता येते याचे नेमके उदाहरण देऊन त्यांनी विद्यार्थिनींना आश्वासित केले. एखाद्या महिलेचे व्यक्तिमत्व तिच्या शिक्षणाने ,राहणीमानाने, समाजात वावरतांना सहज लक्ष वेधून घेते, असे त्यांनी सांगितले.
या शिबिराचे प्रास्ताविक डॉ. जगन्नाथ बरशिले यांनी केले. सूत्रसंचालन संस्कृती जोशी व प्रियंका लोणारे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका अनिता पावसे यांनी केले. या शिबिरास महाविद्यालयातील विद्यार्थीनी, प्राध्यापक, प्राध्यापिका उपस्थित होते.हे शिबिर यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.