भालेश्वर विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ
पाथर्डी प्रतिनिधी:
तालुक्यातील भालगाव येथील भालेश्वर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण दि. 30 जानेवारी रोजी उत्साहात पार पडले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प. नवनाथ महाराज शास्त्री(महंत मच्छिंद्रनाथ गड भालगाव),प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.श्री कैलासजी दौंड, प्रसिद्ध कवी मा.श्री दीपकजी महाले, विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री हनुमानजी गोर्डे, शिक्षक प्रतिनिधी श्री.श्रीकांत सोनवणे, समन्वयक श्री.दिगंबर नजन आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ या सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी मान्यवरांच्या स्वागतासाठी स्वागत गीताचे गायन केले. यावेळी अनेक स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
वार्षिक स्नेहसंमेलना निमित्त विविध गुणदर्शनामध्ये एकल नृत्य, नाटिका, गीत गायन, संगीत नृत्य, समूह नृत्य, तसेच गणित, विज्ञान अध्यापक संघ,खो-खो स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, कुस्ती स्पर्धा,चित्रकला प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसमवेत मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.हनुमान गोर्डे यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांनी कष्ट,चिकाटी, आणि जिद्द जर अंगी बाळगली तर कोणत्याही क्षेत्रात अपयश येत नाही. त्यासाठी मेहनत व कष्ट घेऊनच यश संपादन केले पाहिजे, त्यातूनच चांगले व्यक्तित्व व व्यक्तिमत्व घडू शकते, असे स्पष्ट करून विद्यालयाच्या यशाचा चढता आलेख सांगितला.
यावेळी अध्यक्षीय भाषणातून ह.भ.प. नवनाथ महाराज शास्त्री यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी डॉ.श्री कैलास दौंड यांनी आपल्या व्याख्यानातून ग्रामीण जीवनाचे खरे वास्तव विद्यार्थ्यांना विविध कवितांमधून सांगितले. तसेच आई-वडील, गुरु यांचा आदर्श घेऊन आपल्या जीवनामध्ये यश संपादन करावे, असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. प्रसिद्ध कवी मा. श्री दिपकजी महाले यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री.सुरेशराव गायके,श्री अंबादास कोरडे,श्री अनिल गायकवाड, श्री रघुनाथ बनसोडे, श्री दत्तू बडे, श्री महादेव खेडकर, सौ.खेडकरताई,पालक व ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते.
विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भाऊसाहेब शिंदे यांनी केले तर आभार श्री श्रीकांत सोनवणे यांनी मानले.