बाबुजी आव्हाड महाविद्यालयात तीन दिवसीय डॉ.बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला संपन्न
पाथर्डी दि.२९ जानेवारी २०२५ (सुयोग कोळेकर)
येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात तसेच बहिशाल शिक्षण मंडळ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय डॉ.बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे आयोजन येथील बाबूजी आव्हाड महाविद्यालयात करण्यात आले होते.
सदर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प डॉ.गोकुळ क्षीरसागर यांनी सिनेमा क्षेत्रातील करीयरच्या संधी या विषयावर गुंफले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बबन चौरे, केंद्र कार्यवाह प्रा.दत्तप्रसाद पालवे, डॉ.भगवान सांगळे, डॉ.अशोक डोळस आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना डॉ.क्षीरसागर म्हणाले, सिनेमा हा समजण्यासाठी खूप सोपा आहे परंतु शिकण्यासाठी खूप अवघड विषय आहे.जगात सर्वात जास्त सिनेमे भारतात बनत असून सिनेमाभोवती खूप मोठे अर्थकारण फिरत असते.सिनेमात स्पॉट बॉय पासून पटकथा लेखक ते कोरिओग्राफी पर्यंत करियर च्या अनेक संधी उपलब्ध असून ग्रामीण भागातील मुलांनाही सिनेमा क्षेत्रातील करियर खुणावत आहे.सोशल मिडीयाच्या वाढत्या वापरामुळे ग्रामीण भागातील मुले रील्स बनवून आपल्या प्रतिभेची चुणूक जगाला दाखवत आहे.येणाऱ्या काळात या क्षेत्रातील करियरचा ग्रामीण विद्यार्थ्यांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प डॉ अशोक ढोले यांनी गुंफले. त्यांनी ‘मुलखावेगळी माणसे’ या विषयावर बोलताना जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जीवनपट उलगडून दाखवला.बाबा आमटे यांनी ,१९५२ साली कुष्ठरोग्यांसाठी आश्रमाची स्थापना केली.तिथंच कुष्ठरोग्यांची रोजगाराची व्यवस्था केली. अंध,अपंग,लाचार,कर्णबधिर या सगळ्यांना जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगितला.कुष्ठरोग्यांना मानसिक आधार दिला. कुष्ठरोग्यांना नवा आशेचा किरण दाखविला.पाप केल्यानं कुष्ठरोग होतो.अशी समज त्यावेळी होती.ती बाबा आमटे यांनी दूर केली.यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राची जडणघडण केली.महाराष्ट्राला विकास, उत्कर्षाची झळाळी दिली.त्यांनी समाज व राष्ट्र हिताला प्राधान्य देताना कायम जीवन मुल्यांची जोपासना केली.त्यामुळेच ते आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ठरतात असे सांगितले.
व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प जेष्ठ साहित्यकार डॉ.कैलास दौंड यांनी ‘मराठी सामाजिक कविता’ या विषयावर गुंफले.यावेळी दौंड यांनी सांगितले की, इ.स.१११० साली मराठी कविता अस्तित्वात आली. समाजव्यवस्थेचे चित्रण कवितेतून होते. मराठी कविता ही सामाजिक भावनांचा संगम असून समाज समजून घेण्यासाठी सामाजिक कविता महत्वाच्या असतात. तसेच केशवसुतांपासून बा.सी.मर्ढेकर,नारायण सुर्वे,नामदेव ढसाळ आदी कवींच्या काव्यसाधनेचा परामर्श देखील डॉ.दौंड यांनी आपल्या व्याख्यानातून सांगितला.वर्तन बदल हे शिक्षणाचे प्रमुख ध्येय असून अपूर्णतेची जाणीव माणसाला यशस्वी बनविते असे ते शेवटी म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अशोक डोळस तर आभार केंद्र कार्यवाह प्रा.दत्तप्रसाद पालवे यांनी मानले.तीन दिवशीय व्याख्यानमालेस विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.