हर्षदा गरुडची राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण
पाथर्डी येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाची विद्यार्थिनी हर्षदा गरुड हिची देहरादून, उत्तराखंड येथे होणाऱ्या ३८ व्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. हर्षदाची ४५ किलो वजन गटात निवड करण्यात आली आहे.
हर्षदा ही महाविद्यालयाची आंतरराष्ट्रीय खेळाडू असून तिने ग्रीस या देशात झालेल्या जागतिक ज्युनियर अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत भारतास पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते.
भारताच्या प्रतिष्ठित असलेल्या या स्पर्धेत एकूण ३२ क्रीडा प्रकारात भारतातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशाचे एकूण १० हजार खेळाडू, अधिकारी व प्रशिक्षक सहभागी होणार आहे. हर्षदा ही नॅशनल गेम्स मध्ये सहभागी होणारी महाविद्यालयाची तिसरी खेळाडू असून या आधी गुजरात व गोवा येथे झालेल्या नॅशनल गेम्स, वेटलिफ्टिंग स्पर्धेत महाविद्यालयाच्या कोमल वाकळे हिने महाराष्ट्र संघास दोन सुवर्णपदक तर योगिता खेडकर हिने एक कांस्यपदक मिळवून दिले होते.
या यशाबद्दल पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ॲड. सुरेशराव आव्हाड, बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन चौरे यांनी अभिनंदन केले. तिला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक व अहिल्यानगर जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव प्रा.डॉ. विजय देशमुख व प्रा. सचिन शिरसाट यांचे मार्गदर्शन मिळाले.