पाथर्डी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत चौथीच्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण
ग्रामस्थांच्या मध्यस्थीनंतर तक्रार थांबली; शिक्षकावर प्रशासकीय कारवाईची शक्यता

पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता चौथीच्या एका विद्यार्थ्याला वर्गशिक्षकांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. गणिताचा एक प्रश्न सोडवता न आल्याच्या कारणावरून शिक्षकांनी रागाच्या भरात विद्यार्थ्याला अत्यंत क्रूरपणे मारहाण केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
मारहाण झाल्यानंतर सदर विद्यार्थी घरी आल्यानंतर त्याने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. पालकांनी विद्यार्थ्याची पाठ तपासली असता त्यावर मारहाणीचे गंभीर निशाण आढळून आले. या प्रकारामुळे विद्यार्थी प्रचंड भयभीत झाल्याचेही दिसून आले. त्यानंतर पालकांनी विद्यार्थ्याला तातडीने दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनीही ही मारहाण अतिप्रमाणात झाल्याचे नमूद करत शिक्षकांच्या वर्तनाबाबत नाराजी व्यक्त केली.
या घटनेनंतर संतप्त झालेल्या पालकांनी पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित शिक्षकाविरोधात तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र काही ग्रामस्थांनी पालकांची समजूत काढत या विषयावर सर्वांनी एकत्र चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगितले.
त्यानुसार शनिवारी सकाळी शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, संबंधित शिक्षक, पालक तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांची बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित शिक्षकाला सर्वांनीच चांगलेच खडसावले असून, भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये, याबाबत सक्त ताकीद देण्यात आली.
दरम्यान, याच शिक्षकांकडून यापूर्वीही अनेक विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचे तसेच काही विद्यार्थ्यांशी उद्धट भाषेत बोलल्याचे प्रकार घडल्याची माहिती काही पालकांनी बैठकीत दिली. त्यामुळे सदर प्रकरण हे एकदाच घडलेले नसून यापूर्वीही अशा तक्रारी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी पालकांनी कायदेशीर कारवाई करण्याची ठाम भूमिका घेतली होती. मात्र ग्रामस्थांच्या मध्यस्थीमुळे त्यांनी सध्या नरमाईची भूमिका घेतली असली तरी संबंधित शिक्षकावर प्रशासकीय कारवाई होणार असल्याचे बोलले जात आहे. शिक्षण विभागाकडून याबाबत नेमकी काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







