जनतेच्या मनात घर करणारे खरे विकासपुरुष — आमदार शिवाजीराव कर्डिले

शब्दांकन: सचिन नन्नवरे, मिरी , ता.पाथर्डी
राहुरी–नगर–पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजीराव भानुदास कर्डिले यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने पाथर्डी, राहुरी आणि नगर सह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली असून त्यांच्या कर्तृत्वाची परंपरा आजही प्रत्येक गावाच्या विकासकामांमध्ये जिवंत आहे.

विकासाचे शिल्पकार — वांबोरी चारी योजनेचे जनक
स्व.आमदार कर्डिले यांनी पाथर्डी तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या वांबोरी चारी योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक पाझर तलाव भरून काढले आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसा पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला.

या योजनेतून काही गावे वंचित राहिल्याचे लक्षात घेऊन त्यांनी “वांबोरी चारी टप्पा २” ही स्वतंत्र योजना मंजूर करून घेतली.
या योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करून घेतल्यामुळे या भागातील पाण्याची कायमस्वरूपी सोय होणार आहे. सध्या या योजनेचे काम प्रगतीपथावर असून लवकरच पूर्णत्वाकडे जाणार आहे.पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजीराव पालवे या कामावर लक्ष ठेवून आहेत.

ग्रामविकास आणि सामाजिक परिवर्तन
आमदार कर्डिले यांनी मतदारसंघातील पाथर्डी तालुक्यातील मिरी, करंजी, तिसगाव, लोहसर, आडगाव, कामत शिंगवे, मोहोज, दगडवाडी, गितेवाडी, डमाळवाडी, डोंगरवाडी, कोल्हार, सातवड, शंकरवाडी, कडगाव यांसारख्या अनेक गावांमध्ये भरीव विकासकामे केली.

त्यामध्ये सभामंडप, हायमॅक्स लाईट, देवस्थानांचे सुशोभीकरण, दलित वस्ती विकास, महिला सक्षमीकरण, शाळांच्या वर्गखोल्या व शैक्षणिक विकास, मुख्य डांबरी रस्ते व वाड्या वस्त्यांवरील शेत व पाणंद रस्त्यांची दुरुस्ती, बंधारे व पाणीसाठ्यांची निर्मिती असा सर्वांगीण ग्रामविकासाचा ठसा उमटविला.
राजकीय नेतृत्व आणि जनसंपर्क
राजकीय नेतृत्व आणि जनसंपर्कआमदार कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांमध्ये ग्रामपंचायत व सेवा संस्थांवर त्यांच्या गटाची सत्ता होती. त्यांनी अनेक गावांमध्ये विरोधी गटांची सत्ता उलटवून आपल्या कार्यकर्त्यांना पाठबळ दिले.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे सर्वच कार्यकर्ते उत्साहात होते. मिरी-करंजी गटातून जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळावी म्हणून अनेक जण फिल्डिंग लावत होते.

मिरी –तिसगाव नळ योजनेचे अध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य एकनाथ आटकर, भाजप तालुका मंडल अध्यक्ष तथा माजी सरपंच संतोष शिंदे, पाथर्डी बाजार समितीचे संचालक वैभव खलाटे, जिल्हा परिषद कर्मचारी युनियन सोसायटीचे माजी चेअरमन व सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार कोरडे साहेब तसेच भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते व मंत्री भरतशेठ गोगावले यांचे निकटवर्तीय डॉ.नंदकिशोर बबनराव नरसाळे हे प्रमुख इच्छुक व दावेदार होते.

याचप्रकारे पंचायत समितीसाठीही त्यांच्या निष्ठावंत सहकाऱ्यांमधील सुरवातीचे सहकारी अण्णा पाटील शिंदे, जिजाबा लोंढे, पोपटराव कराळे यांचा समावेश होता. परंतु सर्वांचे एकच मत होते — आमदार कर्डिले सांगतील तोच उमेदवार अंतिम मानून आपण निवडणुकीत काम करायचे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावरच आमदार कर्डिले यांचे दुर्दैवी निधन झाल्याने त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते राजकीय दृष्ट्या पोरके झाले आहेत. त्यांच्या वारशाचे राजकीय नेतृत्व आता अक्षय दादा कर्डिले यांच्या हाती येणार आहे. अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील,आमदार मोनिकाताई राजळे, आणि मेव्हणे आमदार संग्राम जगतापहे सर्वजण उभे राहतील यात शंका नाही.

जनता दरबार – जनतेचा न्यायालय
आमदार कर्डिले यांच्या कार्यशैलीचा सर्वात वेगळा पैलू म्हणजे त्यांचा ‘जनता दरबार’. दररोज सकाळी नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यांनी थेट संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून प्रश्न सोडवले. त्यामुळे त्यांच्या जनता दरबारात नेहमी गर्दी असायची आणि “जनतेच्या घराघरातला आमदार” म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झाली होती.

हिंदू धर्म रक्षणाची भूमिका
शेवटच्या काही वर्षांत आमदार कर्डिले हे हिंदू धर्मरक्षक म्हणूनही प्रसिद्ध झाले होते.

राजकारणातील त्यांच्या भविष्यवेधी दृष्टिकोनाची अनेक उदाहरणे आहेत.माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील काँग्रेसमध्ये असताना त्यांनी मिरी येथील कार्यक्रमात स्पष्टपणे भाकीत केले होते की “सुजय विखे हे भाजपकडून खासदार होतील. नंतर त्यांनीच सुजय विखेंना भाजपमध्ये आणून त्यांना विजयी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच प्रा.राम शिंदे यांना विधान परिषदेचे सभापती बनविण्यासाठी ठराव घेऊन शिफारस केली होती. ते जे बोलायचे ते कृतीत आणायचे “कर्डिले बोलले म्हणजे होणारच” असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.

कर्तृत्व, वकृत्व व नेतृत्वाचा त्रिवेणी संगम
दिवंगत आमदार कर्डिले हे राजकारणातील खऱ्या अर्थाने कसलेले नेते होते. कर्तृत्व, वकृत्व आणि नेतृत्व यांचा त्रिवेणी संगम त्यांच्या अंगी होता. ते ज्या सभेला उपस्थित असतील तिथे गर्दी होणार आणि त्यांच्या भाषणातून हशा होणारच हे निश्चित मानले जायचे.

अमर कर्तृत्वाची ओळख
आज आमदार शिवाजीराव कर्डिले शरीररूपाने आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य, त्यांचा ठसा आणि त्यांची विचारसरणी आजही कायम आहे. त्यांच्या प्रत्येक विकासकामात, प्रत्येक पाणी योजनेत आणि प्रत्येक सभामंडपात त्यांचा श्वास आहे.
त्यामुळे आनंदात विलीन झालेले आमदार कर्डिले म्हणत असतील की “असेल मी, नसेल मी पण कर्तृत्वातून दिसेल मी.”

अशा या लोकनेत्याला राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थकांच्या वतीने विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली.
शब्दांकन व संकलन : पत्रकार सचिन नन्नवरे, मिरी, ता.पाथर्डी, 8888770819










