चारचाकीला धडक देऊन अवैध मुरूम वाहतुक करणारा ट्रॅक्टर चालक पसार
वाहनाचे मोठे नुकसान ; सुदैवाने जीवितहानी टळली

सचिन नन्नवरे
मिरी: पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव हद्दीत रविवारी दुपारी अवैध मुरूम वाहतूक करणाऱ्या एका हिरव्या रंगाच्या जॉन डिअर कंपनीच्या ट्रॅक्टरने मिरीकडून पाथर्डीकडे जात असलेल्या चारचाकी वाहनाला (एम.एच.१२ एस एक्स ७७१६) जोराची धडक दिल्याने मोठा अपघात घडला आहे.या अपघातात चारचाकी वाहन दोन पलट्या खाऊन रस्त्याच्या खाली गेले होते. सुदैवाने या अपघातात वाहनातील कुटुंबियांना किरकोळ दुखापत झाली असली तरी चारचाकीचे सर्व बाजूंनी मोठे नुकसान झाले आहे. अपघात करून ट्रॅक्टर चालक मात्र मुरूमांनी भरलेली ट्रॉली घेऊन घटनास्थळून पसार झाला असल्याची माहिती तक्रारदार संदीप भागवत गवळी (रा. परीटवाडी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात दिली आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या मते संबंधित ट्रॅक्टरच्या मदतीने कारखाना परिसरालगतच्या खाजगी जमिनीत बेकायदेशीररीत्या मुरूम टाकण्याचे काम सुरू होते. त्यामुळे अशा बेजबाबदार ट्रॅक्टरचालक व मालकावर कायदेशीर कारवाई करून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी गवळी यांनी केली आहे.
सदर तक्रारीची गंभीर दखल घेत पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी सहाय्यक फौजदार नितीन दराडे यांना सदर ट्रॅक्टर व चालकाचा शोध घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

अवैध व्यवसायाला आशीर्वाद कोणाचा?
कासार पिंपळगाव परिसरास वाळू, मुरूम या गौण खनिजासह इतरही काही अवैध व्यवसाय सुरू असून त्याचा नागरिकांना त्रास होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. यासाठी याठिकाणी पोलीस चौकी उभारण्याचा प्रयत्न होत असताना काही घटकांनी त्यास विरोध केल्यानेच चौकी होऊ शकली नसल्याची चर्चा स्थानिकांत आहे. पाथर्डी–शेवगाव च्या आमदार मोनिकाताई राजळे यांचेच हे गाव असल्याने आ. राजळे यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.







