शाळेची बस पाटाच्या कडेला कलंडताच टळला अनर्थ; ७० विद्यार्थी सुखरूप
स्थानिकांच्या तत्परतेने आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढून बचाव
चालक नशेत असल्याचा आरोप, संस्थेकडून स्वतंत्र बस व अनुभवी चालक देण्याचे आश्वासन

अहिल्यानगर : ढोरजळगाव येथील त्रिमूर्ती शिक्षण संस्थेच्या ठकुबाई हरिभाऊ घाडगे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची स्कूलबस सोमवारी सायंकाळी शाळेतील विद्यार्थ्यांना घरी पोहोच करत असताना महालक्ष्मी हिवरे शिवारात पाटाच्या कडेला घसरून एक बाजूला कलंडताच मोठा अनर्थ टळला आहे. बसमध्ये सुमारे ६० ते ७० पेक्षा जास्त विद्यार्थी असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप वाचवण्यात यश आले असून काहींना किरकोळ दुखापती झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत आपत्कालीन दरवाजातून विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले.
घटनेदरम्यान परिसरातील पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले. त्यावेळी झालेल्या चर्चेत बसचा चालक नशेत असल्याचा आणि तो गुन्हेगार असून त्याचे पोलिस पडताळणी न झाल्याचा आरोप काही पालकांनी केला. तसेच हिवरे–शेवगाव रस्त्यावर अधिकृत मार्ग नसताना पाटाच्या कडेने बस नेल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. चालकाला ग्रामस्थांनी थांबवून विचारणा केली असता त्याने बेताल वक्तव्य केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
घटनेनंतर शाळेचे काही शिक्षक घटनास्थळी पोहोचले. आडगाव आणि महालक्ष्मी हिवरे या दोन गावांतील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बसेस उपलब्ध करून त्या बसवर सुशिक्षित व अनुभवी चालक नेमण्याचे आश्वासन त्यांनी दिले. काही पालकांनी सामंजस्याने कोणताही गुन्हा दाखल न करण्याची भूमिका घेतली असली, तरी अन्य काही पालकांनी चालकासह संबंधित शिक्षण संस्थेवरही कारवाईची मागणी करीत अधिकृत पोलिस तक्रार नोंदवण्याचा आग्रह धरला.
दरम्यान, पालकांकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा प्रशासन व संबंधित विभागांनी बससेवेचे तातडीने सुरक्षा ऑडिट करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.







