राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंद ऋषीजी महाराज यांचा १२५ वा जन्मोत्सव सोहळा
माणिकदौंडी येथे आनंद रथयात्रेचा शुभारंभ संपन्न
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंद ऋषीजी महाराज यांचा १२५ वा जन्मोत्सव सोहळा दिनांक २४ व २५ जुलै रोजी होत आहे. त्यानिमित्ताने आनंद ऋषीजी महाराज यांचे गुरु शिक्षणमहर्षी रत्न ऋषीजी महाराज यांचे जन्मगाव असलेल्या माणिकदौंडी येथे सकाळी परिसरातील भाविकांच्या उपस्थितीत श्री आनंद रथयात्रेचा शुभारंभ २४ जुलै रोजी संपन्न झाला.
यावेळी माणिकदौंडीचे रहिवासी मा. पंचायत समिती सदस्य तथा गटनेते सुनिल ओव्होळ, मा. ग्रामपंचायत सदस्य पोपटभाई पठाण, बाळासाहेब कांबळे, संपतराव गायकवाड, पोलीस पाटील वसंतराव वाघमारे, गौतम पटवा, बाबुराव काळे, सोसायटी चेअरमन आलमगीरभाई पठाण, व्हॉ. चेअरमन भास्कर गर्जे आदी मान्यवर तसेच रत्न जैन विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम माळी, आश्रम शाळा मुख्याध्यापक शंकर राठोड, वसतीगृह अधीक्षक सदानंद सुतार, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
माणिकदौंडी गावचे ग्रामपंचायत सरपंच शायदभाई पठाण यांचे हस्ते नारळ वाढविण्यात आले. त्यानंतर संस्थेचे विश्वस्त, सदस्य व गावातील मान्यवरांच्या हस्ते रथाचे पूजन करण्यात आले. तसेच मंगळीक घेऊन रथयात्रेस प्रारंभ झाला. रथयाञेमध्ये कलशधारी मुली, झांजपथक, टिपरी पथक, लेझीम पथक व लाठी-काठी पथक सहभागी झाले होते. दुपारी पाथर्डी शहरात रथयात्रेचे आगमन होऊन शनी मंदिरापासून सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या व मान्यवरांच्या हस्ते राथाचे पूजन करण्यात आले. मुख्य सोहळा शुक्रवार दि.२५ रोजी आनंद ऋषीजी यांचे जन्मगाव असलेल्या चिचोंडी (शिराळ) येथे होणार आहे.
जन्मोत्सव सोहळा यशस्वी होण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष चंपालाल गांधी, सचिव सतिश गुगळे, खजिनदार सुरेश कुचेरिया, विश्वस्त धरमचंद गुगळे, डॉ. ललित गुगळे, राजेंद्र मुथ्था आदीसह कार्यकारी मंडळ सदस्य तसेच संस्थेतील सर्व विभागाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी प्रयत्न करीत आहेत.