राजळे महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी शस्त्रक्रियेसाठी केली आर्थिक मदत
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
येथील दादापाटील राजळे महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपले सहकारी प्रा. सोमनाथ चांदणे यांच्या मातोश्री सौ. उषाताई नारायण चांदणे यांच्यावर मेंदूवरील अवघड शस्त्रक्रिया करणेकरीता भरीव आर्थिक मदत करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. काही महिन्यांपासून मेंदूच्या दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या सौ. चांदणे अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार घेत होत्या. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने शस्त्रक्रियेसाठीचा खर्च सदर कुटुंबाला पेलवत नसल्याने त्यांच्यावतीने आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. टेमकर व इंग्रजी विभागप्रमुख डॉ. एम. एस. तांबोळी यांनी महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वइच्छेने आर्थिक मदत करणेकामी पुढाकार घेतला. सर्व घटकांनी एकूण तीस हजार रुपये जमा केले. जमा केलेली रक्कम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. टेमकर, कार्यालय अधीक्षक श्री. विक्रम राजळे, कला शाखाप्रमुख डॉ. एम. एस. तांबोळी व आय. क्यु. ए. सी. समन्वयक डॉ. आर. टी. घोलप यांचे हस्ते श्री. चांदणे यांना सुपूर्द करण्यात आली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे विद्याशाखाप्रमुख डॉ. जे. एन. नेहुल, डॉ. एस. जे. देशमुख, प्रा. सी. एन. पानसरे, डॉ. जी. बी. लवांडे, वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. किशोर गायकवाड यांनी केले.