आडगावच्या विकास भारती यांची मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक पदावर निवड

मिरी: पाथर्डी तालुक्यातील आडगाव या छोट्याशा गावातील चि.विकास रावसाहेब भारती यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि अथक प्रयत्नांच्या जोरावर थेट मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक या पदावर यश मिळवले आहे.
विकास भारती यांनी प्राथमिक शिक्षण आडगाव येथे व माध्यमिक शिक्षण मिरी येथे घेऊन पुढे त्यांनी के. के. वाघ कॉलेज, नाशिक येथून B.Tech इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण संपल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचा निर्णय घेतला.
२०२० साली कोरोना काळात परिस्थितीमुळे घरीच राहून अभ्यास सुरू ठेवला. त्यानंतर २०२२ पासून ते राहुरी येथे पूर्णवेळ अभ्यास करत आहेत. या कालावधीत त्यांनी एमपीएससीच्या पोलीस उपनिरीक्षक, कर सहाय्यक अशा अनेक मुख्य परीक्षा दिल्या. सुरुवातीला अपयश आले, पण त्यांनी हार मानली नाही.
त्यांच्या मेहनतीचं फळ म्हणून, सहकार अधिकारी श्रेणी-१ (मुंबई), फॉरेस्ट अकाउंटंट (पुणे), पुरवठा निरीक्षक, विस्तार अधिकारी, तलाठी (बीड) अशा विविध पदांसाठी त्यांची निवड प्रक्रियेत प्रतीक्षा यादीत वरचा नंबर आहे आहे.
त्यांची नुकतीच मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक पदावर निवड झाली असून, BMC निरीक्षक पदासाठीही त्यांनी चांगली गुणवत्ता (Rank) मिळवली असून निकाल प्रतीक्षेत आहे.
सध्या विकास भारती हे एमपीएससीच्या मुख्य परीक्षेची तयारी करत आहेत. त्यांच्या यशामध्ये स्वतःचा स्वअभ्यास, सातत्य, संयम आणि कुटुंबीयांचा पाठिंबा मोलाचा ठरला आहे.
विकास यांचे यश इतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून त्याच्या यशाबद्दल पंचक्रोशीतील विविध मान्यवरांकडून अभिनंदन केले जात आहे.