करंजी येथील उत्तरेश्वराची आजपासुन यात्रा-धार्मिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन
करंजी(अशोक मोरे):
करंजी (प्रति)- पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील जागृत देवस्थान श्री उत्तरेश्वराच्या यात्रेस आजपासुन सुरुवात होत असुन दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेनिमित्त यात्रा कमिटीने उत्तरेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी अनेक मनोरंजनाचे व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
सोमवारी उत्तरेश्वराच्या मंदिरातुन श्रीक्षेत्र पैठणकडे पालखीचे प्रस्थान झाले. पालखीसोबत गावातील तसेच परिसरातील शेकडो तरुण पैठण येथुन गंगेचे पाणी आणण्यासाठी रवाना झाले. आज सकाळी (दि. १० एप्रिल रोजी) सकाळी कावडी दानवेवस्ती जवळील फुलरबाग येथे जमा होतात. तेथुन पालखीसह कावडीवाल्यांची भव्य मिरवणुक काढली जाणार आहे. पालखीची मिरवणुक पहाण्यासाठी हजारो भाविक येत असतात. पैठणहुन आणलेल्या पाण्याने उत्तरेश्वराला जलाभिषेक घातला जातो. त्यानंतर दुपारी अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सायंकाळी सात वाजता छबीना मिरवणुक काढण्यात येणार असुन त्यावेळी आकर्षक फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे. रात्री साडेनऊ वाजता उत्तरेश्वर सभा मंडपात आर्केस्ट्राचे आयोजन केले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी कलाकारांच्या हजेर्यांचा कार्यक्रम होणार असुन दुपारी तिन वाजता उत्तरेश्वर सभामंडपात भव्य कुस्त्यांचा हगामा भरविण्यात येणार आहे. यावेळी एक हजारापासुन एक लाखापर्यत इनामी कुस्त्या होणार आहेत. यात्रेनिमित्त मंदिरावर आकर्षण विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त जागृत देवस्थान उत्तरेश्वराच्या दर्शनासाठी गावातील, परिसरातील तसेच बाहेर गावाहुन हजारो भाविक येत असतात.