सौ.भावना पालवे यांना आदर्श सरपंच पुरस्कार
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
तालुक्यातील शिरसाटवाडी गावच्या सरपंच सौ.भावना अविनाश पालवे यांना राष्ट्रीय लोकराज्य न्यूज समूह महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार २०२५ जाहीर झाला असुन तसे निवडपत्र मुख्य संपादक राहुल कुदनर यांनी पाठवले आहे.
चार वर्षांपूर्वी २०२१ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांनी प्रथमच नवनिर्माण पॅनल करून निवडणूक लढवली. निवडणुकीच्या अगोदर केलेली कामे याचा विचार करून गावातील जनतेने सर्वच्या सर्व नऊ जागांवर नवनिर्माण पॅनलला निवडून दिले. पॅनल प्रमुख अविनाश पालवे सदस्य पदी व पत्नी सौ.भावना पालवे या सरपंच पदी निवडून आल्या.
जनतेने टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता पालवे यांनी ग्रामपंचायतीकडे असणाऱ्या तोकड्या निधीवर अवलंबून न राहता गावामध्ये लाईट, रस्ते, पाणी व मूलभूत सुविधांची कामे करण्यासाठी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून मंत्रालय स्तरावरून कामे मंजूर करून गावात विकासकामे केली. याचीच दखल घेत दोन वर्षांपूर्वी सरपंच सेवा संघाच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्कार मिळाला व राष्ट्रीय लोकराज्य समूहाचा आदर्श सरपंच २०२५ हा पुरस्कार देखील जाहीर झाला आहे. ६ एप्रिल रोजी पुणे येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे. अविनाश पालवे यांनी सांगितले की, हा गावाचा सन्मान असून गावामुळेच आम्ही आहोत. आम्ही हा सन्मान गावातील जनतेला अर्पण करत आहोत.