‘छावा’ चित्रपट पाहून मिरी ग्रामस्थ झाले भावुक
छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त विशेष आयोजन
मिरी: पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त ‘छावा’ या ऐतिहासिक चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी चित्रपटात मुघलांनी शंभूराजांना दिलेल्या यातना पाहून उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्याचे तसेच अनेक जण भाऊ झाल्याचे दिसून आले.
या चित्रपटाच्या माध्यमातून संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा ग्रामस्थांना अनुभवता आली. विशेषतः तरुण पिढीला त्यांच्या बलिदानाचे महत्त्व पटवून देण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे.
हा चित्रपट पाहण्यासाठी मिरी ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला. छोट्या बालकांपासून अबाल वृद्धांपर्यंत अनेक शंभू प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा चित्रपट पाहिला आणि संभाजी महाराजांच्या शौर्याचा अनुभव घेतला.
या चित्रपटाद्वारे संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग आणि त्यांच्या संघर्षमय जीवनाचा परिचय गावकऱ्यांना मिळाला.
या उपक्रमामुळे छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार होण्यास मदत झाली असून, भविष्यात असेच ऐतिहासिक आणि प्रेरणादायी कार्यक्रम गावात घेतले जावेत, अशी भावना मिरी ग्रामस्थांनी व्यक्त केली.
सदर चित्रपटाचे आयोजन जिल्हा परिषद कामगार युनियन सोसायटीचे माजी अध्यक्ष विजयकुमार कोरडे, महसूल अधिकारी संतोष झाडे यांनी केले होते.तर त्यांना दर्शन ऑडिओ चे संचालक ओमप्रकाश कोरडे,आदिनाथ सोलाट,गोरक्ष पाटील व गिरधारी डहाळे व परिवार यांच्यासह स्थानिक शिवप्रेमींचे विशेष सहकार्य लाभले.