युवकांनो कृषी क्षेत्रात झेप घ्या, येणारा काळ तुमचाच असेल – आ.मोनिकाताई राजळे
सुयोग कोळेकर,पाथर्डी
श्री दादापाटील राजळे शिक्षण संस्थेच्या अंतर्गत सुरू असलेले व महात्मा फुले कृषी विद्यापीठ मान्यता प्राप्त डॉ.अण्णासाहेब शिंदे कृषी तंत्र विद्यालय , आदिनाथनगर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी क्षेत्रात भरघोस उत्पादन मिळवणाऱ्या व गुणवत्तापूर्ण शेतमाल उत्पादित करणाऱ्या तसेच कृषी आधारित स्वयंरोजगार उद्योगात स्वतःची नवी ओळख निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव शेवगाव – पाथर्डी तालुक्याच्या आमदार मोनिकाताई राजळे व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित शेतकरी व विद्यार्थी यांना त्यांनी मार्गदर्शन केले.
कोरडवाहू शेतीवर वातावरणाचा होत असणारा परिणाम आणि सातत्याने वाढत जाणारा दुष्काळ किंबहुना नैसर्गिक आपत्तींच्या मुळे दिवसेंदिवस कृषी क्षेत्रा पुढे वाढत्या समस्या उद्भवताना दिसून येतात. तसेच शेती क्षेत्रात दिवसेंदिवस कमी होत जाणारे मनुष्यबळ , शेतमालाची आवक वाढल्यास बाजारभावाची अनिश्चितता , कृषी निविष्ठा खरेदीसाठी होणारा खर्च या घटकावर मार्ग काढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे . या समस्यांना तोंड देण्यासाठी आणि भविष्यकाळात कमी होत जाणाऱ्या पावसाच्या प्रमाणानुसार पीक पद्धती शोधून त्यावर योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. सध्याच्या काळात आनंदाची बाब म्हणजे कृषी क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढत असल्याचे दिसून येत आहे .युवकांनी कृषीक्षेत्राचे अद्ययावत व तांत्रिक ज्ञान स्वीकारून प्रात्यक्षिका वर भर दिल्यास एकुणच शेती क्षेत्रातील उत्पन्न दुपटीने वाढण्यास मदत होईल .भविष्याचा विचार करता विस्तारणारे कृषीक्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देणारे असेल . त्यामुळे युवा शेतकऱ्यांनी कृषि तंत्रज्ञान आत्मसात करून गटशेती सारख्या सामूहिक बाबींचा अवलंब केल्यास शेती समृद्ध होऊ शकते .
शेतकरी ,कृषी विभाग व राज्य शासन या त्रिवेणी संगमाच्या आधारे निश्चितच कृषी क्षेत्रापुढील समस्या सुटण्यास मदत होईल व राज्याचे नाव कृषी क्षेत्रात देश पातळीवर निश्चितच पोहोचेल हा आशावाद यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला .
यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री . एम . बी . लोंढे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले .कृषी क्षेत्रात अनेक नवनवीन बदल होत आहेत. AI तंत्रज्ञानाचा वापर कृषी क्षेत्रामध्ये सुरू झाला असून अनेक शेतकरी या तंत्राचा उपयोग करताना दिसून येत आहेत . महिलांचा देखील सहभाग हा कृषी क्षेत्रातील महत्त्वाचा मानबिंदू ठरत आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला उद्योजकांसाठी अन्नप्रक्रिया उद्योग हा संपूर्ण महिलांनासक्षम करणारा प्रभावी मार्ग ठरत आहे . या उद्योगामुळे मोठ्या प्रमाणावर महिलांचे सक्षमीकरण होत आहे . तसेच शासनाच्या विविध योजना सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य कृषी विभागाकडून सक्षमरित्या सुरू असल्याचे यावेळी बोलताना श्री एम बी लोंढे (तालुका कृषी अधिकारी ) यांनी सांगितले . कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान व राज्य शासनाच्या शेतकऱ्यांविषयी नवनवीन योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले .
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य सुनिल पानखडे यांनी कृषी विद्यालयाचे यशस्वी विद्यार्थी , कृषी उद्योजक व कृषी विद्यालयातील विविध उपक्रमाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष रामकिसन काकडे यांनी शेतकरी मेळाव्या दरम्यान पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे अभिनंदन केले .
यावेळी श्री.बी.एम.लोंढे (तालुका कृषी अधिकारी,पाथर्डी ), श्री.नंदकिशोर थोरे (मंडळ कृषी अधिकारी,तिसगाव), श्री.राहुल राजळे (विश्वस्त, श्री.दादा पाटील राजळे शिक्षण संस्था), श्री.रामकिसन काकडे, (व्हाईस चेअरमन वृ.सह.सा.का.लि. आदिनाथनगर), श्री.रामदास म्हस्के (उपाध्यक्ष , शिवाजी विद्या विकास मंडळ ), श्री .विक्रमराव राजळे (सचिव , शिवाजी विद्या विकास मंडळ ) , श्री . आर .जे .महाजन, (सचिव , श्री . दादापाटील राजळे शिक्षण संस्था ) , श्री .बी. एम .गोरे . (सचिव , आदिनाथ कृषी विकास प्रतिष्ठान ), डॉ राजधर टेमकर ( प्राचार्य , दादापाटील राजळे कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय , डॉ.प्रदीप देशमुख ( प्राचार्य , लोकनेते आप्पासाहेब राजळे कॉलेज ऑफ फार्मसी ) , डॉ. संतोष पायघन , आदी प्रमुख मान्यवरांच्या व प्रगतिशील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला .यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते . याप्रसंगी प्रगतशील डाळिंब उत्पादक शेतकरी श्री .मखंळराव पांढरे तसेच शिवकुश भाजीपाला रोपवाटिकेचे संचालक श्री.शशिकांत बोरुडे या प्रगतशील शेतकऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली .
यावेळी कृषी विद्यालयात शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर व शेतकरी बंधूंचे आभार प्रा .संभाजी मरकड यांनी मानले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . राजेंद्र इंगळे यांनी केले.







