श्री आनंद महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
श्री आनंद कॉलेज पाथर्डी येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यंदाच्या कार्यक्रमाची थीम “Accelerate Action” ही होती, ज्यामध्ये महिलांच्या सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शेषराव पवार होते. प्रमुख उपस्थितीत प्रा. जयश्री खेडकर, प्रा. मनीषा सानप, प्रा. अश्विनी थोरात आणि डॉ. इस्माईल शेख यांचा समावेश होता.
यंदा कार्यक्रमाची संकल्पना वेगळी होती. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महाराणी येसूबाई, अहिल्याबाई होळकर, पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांसह राजमाता जिजाऊ, डॉ. आनंदीबाई जोशी, वकील, पोलीस, शिक्षिका आणि वैज्ञानिक अशा विविध क्षेत्रांतील प्रतिभावान महिलांच्या वेशभूषा धारण करून उपस्थितांची मने जिंकली. विविध क्षेत्रांतील महिलांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या सर्व विद्यार्थिनींनी टी.वाय.बी.एस्सी. वर्गातील होत्या. या सहभागी विद्यार्थिनींचा महाविद्यालयात विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात प्राचार्य डॉ. शेषराव पवार यांनी महिलांच्या सशक्तीकरणावर भर देतांना प्रेरणादायी विचार मांडले. ते म्हणाले, “स्त्री ही केवळ सहनशीलतेचे प्रतीक नसून ती आत्मनिर्भर आणि सक्षम असली पाहिजे. स्वसंरक्षण हा काळाची गरज आहे. महिलांनी योग, कराटे आणि आत्मसंरक्षणाच्या कला शिकून स्वतःला सक्षम करावे.”
तसेच, प्रा. मनीषा सानप यांनी “इतिहासात अनेक महिलांनी आपल्या कार्याने समाजाला दिशा दिली आहे. त्यांच्या योगदानाची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे,” असे मत व्यक्त केले.
समन्वयक डॉ. जयश्री खेडकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना “मैं कलियुग की द्रौपदी हूँ, मैं लाज बचाने श्रीकृष्ण नहीं बुलाऊँगी” ही संकलित कविता प्रभावीपणे सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. कावेरी लोणारे हिने तर आभार प्रा. अश्विनी थोरात यांनी मानले.
संपूर्ण महाविद्यालयाने या अनोख्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.