युवकांनी शिवछत्रपतींच्या कार्याचा आदर्श घ्यावा- डॉ. अशोक कानडे
बाबुजी आव्हाड महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
छत्रपती शिवाजी महाराज एक युग प्रवर्तक राज्यकर्ते आणि कुशल प्रशासक होते. मध्ययुगीन भारताच्या इतिहासात ते एक महान व कर्तुत्ववान राजे होऊन गेले. त्यांचे राज्य हे सर्व मान्य व जनतेच्या कल्याणासाठी सतत कार्यरत होते. महाराजांनी राजमुद्रेचा खराखुरा अर्थ आपल्या राज्यकारभारातून अभिव्यक्त केला, असे प्रतिपादन बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख डॉ. अशोक कानडे यांनी केले.बाबुजी आव्हाड महाविद्यालयात शिवजयंती उत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, प्राचार्य डॉ. बबन चौरे व प्रमुख अतिथी म्हणून बीडचे सीए भानुदास जाधव, प्रमोद चव्हाण, विनोद पिंगळे तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक प्राध्यापिका व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे व विद्यार्थी विद्यार्थिनींच्या हस्ते शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
डॉ. अशोक कानडे पुढे म्हणाले की, शिवरायांनी एकाहून एक गडकोट आपल्या ताब्यात घेतले. स्वतंत्रपणे गडकोटांची उभारणी केली त्यांच्या नावाने ३०० गडकोटाच्या निर्मितीची नोंद आहे. गडकोटाचे प्रशासन असो की लोकांचे कल्याणकारी प्रशासन असो यामध्ये त्यांचा लोकाभिमुख दृष्टिकोन दिसून येतो. त्यांनी धार्मिक आणि सांस्कृतिक शोषणातून लोकांची मुक्तता केली. विषमते विरुद्ध झुंज दिली, आपल्या ध्येयधोरणाची अंमलबजावणी करताना त्यांनी धर्मावरून प्रजेमध्ये फरक केलं नाही. सर्वांना बरोबर घेण्याचे ध्येय त्यांनी अंगीकारले. दुष्काळाच्या निर्मूलनासाठी जल साठवणुकीची स्वतंत्र योजना आखून शिवकाळामध्ये महाराष्ट्रातील खेडी अत्यंत संपन्न होती. काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला सहकार्य केले जात होते.
विजयनगरच्या हिंदू साम्राज्य नंतर स्वतंत्रपणे सोन्याची नाणी पाडणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव भारतीय सम्राट दिसून येतात. प्रशासन व अर्थकारण संपन्न आणि समृद्ध असते त्याचवेळी सोन्याची नाणी चलनामध्ये येतात. शिवाजी महाराजांचे राज्य हे त्या काळातील युरोपीय आणि सर्व आशियाई राज्यापेक्षा श्रेष्ठ होते. महाराजांनी आरमारी तळ उभारले पोर्तुगीजांशी लढतांना त्यांच्या रचने मधून परराष्ट्र धोरणाची बीजे प्रकट होतात. प्रशासन व्यवस्थेमध्ये हेरखात्याचा विकास महाराजांनी केला. त्यामुळे अफजल खान वध, लाल महालात शाहिस्तेखानाची बोटे छाटण्याचा प्रसंग, सिद्धी जोहरने वेढा घालूनही महाराजांची पन्हाळा गडाकडून विशाल गडाकडे कुच, आग्र्याहून सुटका हे सर्व प्रभावी हेर खात्यामुळे शक्य झाले. अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती करून कार्य विभाजनाचा आदर्श क्रम त्यांनी मांडला. मध्य काळात लोकशाही परंपरेची बिजे शिवरायांनी रोवले असे ते शेवटी म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. बबन चौरे, सूत्रसंचालन व आभार डॉ. अशोक डोळस यांनी मानले.