श्री तिलोक जैन विद्यालयात शिवजयंती उत्साहात संपन्न
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने शहरातील श्री तिलोक जैन विद्यालयात प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये प्रथम विद्यालय ते पंचायत समिती पर्यंत जय शिवाजी – जय भारत पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेचा शुभारंभ प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे, गटशिक्षणाधिकारी अनिल भवार, विद्यालयाचे प्राचार्य अशोक दौंड, पर्यवेक्षक दिलावर फकीर, अजय भंडारी, सुधाकर सातपुते, कार्यालयीन प्रमुख महेंद्र राजगुरू यांच्या उपस्थितीत करण्यात आला.या पदयात्रेमध्ये ढोल पथक, एनसीसी पथक, स्काऊट गाईड पथक, विद्यार्थी यांचा मोठा सहभाग होता.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी – जय शिवाजी या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
पदयात्रा पंचायत समिती प्रांगणामध्ये पोहोचल्यानंतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी शिवजयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच विद्यालयाने पदयात्रेचे अचूक व देखणे नियोजन केल्याबद्दल विद्यालयाचे विशेष कौतुक केले. त्या नंतर मान्यवरांच्या उपस्थितीत श्री तिलोक जैन विद्यालयाच्या प्रांगणात भव्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमात अध्यक्ष पदावरून बोलतांना विद्यालयाचे प्राचार्य अशोक दौंड यांनी असे प्रतिपादन केले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आपणा सर्वांचे आराध्य दैवत आहेत. त्यांनी स्वराज्याची निर्मिती करून खऱ्या अर्थाने परकीयांच्या गुलामगिरीच्या जोखडातून आपणास मुक्त केले. त्यामुळे त्यांचे कार्य हे अतिशय महान आहे, म्हणूनच प्रतिवर्षी आपण हा शिवजयंती उत्सव अतिशय दिमाखदार पद्धतीने साजरा करतो.
या वेळी सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पोवाडे, नृत्य, नाट्य, गायन या सारखे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या मनात शिवजयंतीचे महत्त्व रुजवण्याचा प्रयत्न केला. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी आनंद संगीत अकॅडमीचे शेखर दरवडे, नेहा दरवडे, श्रद्धा गांधी,गीतांजली सगम व सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.श्रेया तुपे हिने केले तर आभार जिजाऊ बोरसे हिने मानले. सूत्रसंचालन अस्मिता साठे व श्रुतिका बोरूडे यांनी केले.