घुमटवाडी येथे संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती साजरी
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
बंजारा समाजाचे धर्मगुरू तसेच क्रांतिकारक संत श्री सेवालाल महाराज यांची २८६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त दिवस भर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सकाळी ८ वा. ग्रामस्वच्छता व वृक्षारोपण करण्यात आले. बंजारा समाजाला अंधश्रद्धा आणि व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढणाऱ्या संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर महाराजांच्या प्रतिमेची सार्वजनिक मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली.या वेळी गावातील सर्व महिला,पुरुष व लहानथोर मंडळी बंजारा समाजाच्या पारंपारिक वेशभूषा परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाले होते.तरुण मुले महाराजांची शिकवण असलेले बॅनर घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते.यामुळे मिरवणूक खूपच आकर्षक वाटत होती.त्यानंतर सेवालाल महाराज यांच्या मंदिरात महाराजांना भोग भंडारा देण्यात आले व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
सायंकाळच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम,बंजारा गीत तसेच सेवालाल महाराज यांच्या जीवनावर आधारीत बंजारा भजन आयोजित करण्यात आले होते.या सर्व कार्यक्रमावेळी सर्व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.