महाविद्यालयाच्या जडणघडणीत माजी विद्यार्थी संघाचे योगदान महत्वाचे – अविनाश मंत्री
बाबूजी आव्हाड महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघ व पालक मेळावा संपन्न
सुयोग कोळेकर, पाथर्डी
पाथर्डी तालुक्याच्या सामाजिक व राजकीय चळवळीचे नेतृत्व माजी आ.स्व.बाबुजी आव्हाड यांनी उत्तम प्रकारे केले.त्यांच्या सकारात्मक दृष्टीकोनातूनच पाथर्डीच्या जिरायती माळरानात पार्थ विद्या प्रसारक मंडळाची स्थापना झाली.प्रथम वर्षी ४८ मुलांपासून सुरु झालेली जनता महाविद्यालयाची वाटचाल आजमितीस ४८०० विद्यार्थ्यांपर्यंत विस्तारली असून या जडणघडणीत माजी विद्यार्थी संघाचे मोलाचे योगदान आहे असे प्रतिपादन बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अविनाश मंत्री यांनी केले. ते महाविद्यालयात पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित माजी विद्यार्थी संघ व पालक मेळाव्याप्रसंगी बोलत होते.
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.बबन चौरे,सचिव सुभाष केकान,सहसचिव प्रा.रमेश मोरगावकर, सदस्य संतोष दहिफळे, समन्वयक डॉ .अशोक कानडे, शाहीर भारत गाडेकर आदी उपस्थित होते.
अविनाश मंत्री पुढे म्हणाले की, माजी विद्यार्थी संघाने समाजमाध्यमाचा वापर सकारात्मक कामासाठी करून महाविद्यालयाची यशोगाथा प्रत्येक माजी विद्यार्थी व समाज घटकापर्यंत पोहचवावी. महाविद्यालयाचे विचार पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावावा. महाविद्यालयातून स्थापनेपासून आजपर्यंत दीड लाख विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले असून शासकीय, निमशासकीय, सामाजिक, राजकीय, उद्योजक, व्यापारी आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत. समाजातील प्रत्येक घटकाला हे महाविद्यालय आपले वाटत असून महाविद्यालयाच्या भौतिक सुविधा, इमारती बदलल्या असल्या तरी या मातीचा सुगंध प्रत्येक माजी विद्यार्थ्याला भुरळ घालतो असे ते शेवटी म्हणाले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बबन चौरे यांनी महाविद्यालयाच्या कारकीर्दीचा व विकास कामांचा आढावा सांगितला. सुरेश मिसाळ, बंडू पाठक, जगदीश गाडे, देविदास मरकड, बाळासाहेब जिरेसाळ, संतोष एडके, संतोष दहिफळे, सुभाष केकाण, रमेश मोरगावकर आदी माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.बबन चौरे, सुत्रसंचालन समन्वयक डॉ.अशोक कानडे तर आभार डॉ.अजयकुमार पालवे यांनी मानले.