आ.मोनिका राजळे व खा.लंके हे जातीयवादी लोकप्रतिनिधी
बोधेगावच्या मंदिरातील सेवेकऱ्याच्या खूनावरून ॲड.गुणरत्न सदावर्तेंचा गंभीर आरोप
(स्त्रोत – टीव्ही 9 मराठी)
https://youtu.be/5lCqiRWYjjw?si=ytCDRO81FrFc_c82
अहिल्यानगर : मागील आठवड्यात जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे असलेल्या पैलवान बाबा मंदिरातील सेवेकऱ्याचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली होती. परंतु मयत व्यक्ती ही एका ठराविक जातीची असल्यानेच आमदार मोनिका राजळे व खासदार लंके यांनी या अतिशय गंभीर प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून हे दोन्ही लोकप्रतिनिधी जातीयवादी असल्याचा गंभीर व खळबळजनक आरोप ॲड.गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
बोधेगाव येथील पैलवान बाबा मंदिरातील सेवेकरी नामदेव रामा दहातोंडे (वय ६८ वर्षे) यांचा मागील आठवड्यात निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना घडली होती. एका विहिरीत शीर तर दुसऱ्या विहिरीत धड आढळून आल्यानंतर हा खून उघडकीस आला होता. परंतु इतक्या विचित्र पद्धतीने खून होऊन देखील संबंधित परिसरातील शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे व खा.निलेश लंके यांनी या गंभीर प्रकाराकडे जातीच्या नजरेतून पाहूनच जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून हे दोनही लोकप्रतिनिधी सबंधित ठिकाणी गेले नाहीत. त्यामुळे ते जातीवादी असल्याचे सांगून ॲड.गुणरत्न सदावर्ते यांनी गंभीर आरोप केला आहे.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण संदर्भात व इतरही काही घटना संदर्भात आ.सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे व ॲड.गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्याच संदर्भात एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीनी ॲड.गुणरत्न सदावर्ते यांच्याशी संवाद साधून विचारणा केली असता सदावर्ते यांनी सदर वक्तव्य केले आहे. यावेळी बोलताना सदावर्ते यांनी सांगितले की, एकीकडे सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणासंदर्भात सर्वत्र आवाज उठवून एसआयटी चौकशीची मागणी केली व राज्यभर आंदोलने करत आहेत. पण दुसरीकडे एका वृद्ध सेवेकर्याची निर्घृणपणे हत्या होऊन देखील तेथील लोकप्रतिनिधी गप्प का आहेत? सरपंच संतोष देशमुखांची झालेली हत्या जर गंभीर स्वरूपाची आहे तर सेवेकर्याच्या शरीराचे दोन तुकडे करून केलेल्या हत्येला तितके महत्व नाहीये का? जर ही घटना देखील गंभीर स्वरूपाची असेल तर येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील एसआयटी चौकशीची मागणी का केली नाही? संबंधित कुटुंबाला भेट का दिली नाही? तसेच आरोपींना अटक करण्यासाठी प्रशासनाकडे आवाज का उठवला नाही? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करत मयत व्यक्ती ही एका विशिष्ट जातीची असल्यानेच आमदार व खासदारांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले आहे का? त्यामुळे आमदार राजळे व खासदार लंके हे दोन्ही लोकप्रतिनिधी जातीवादी असल्याचा गंभीर व थेट आरोप ॲड.गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. तसेच या प्रकरणावर आ.सुरेश धस व आ.जितेंद्र आव्हाड बोलत नाहीत.हे सर्व वेदनादायी व क्लेश वाटणारे असल्याचे देखील सदावर्ते यांनी पुढे बोलताना म्हटले आहे.
त्यामुळे या आरोपानंतर आमदार राजळे व खासदार लंके हे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.एकीकडे आ.राजळे यांच्यावर ॲड.सदावर्ते यांच्याकडून आरोप होत असताना दुसरीकडे खा.लंके हे दिल्लीतील अधिवेशनात व्यस्त असल्याचे तर आ.राजळे मात्र पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. व विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाच्या आयोजनात व्यस्त असल्याचे दिसून आल्या.तसेच बीड जिल्ह्यातील विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंडे यांच्या कार्यक्रमात देखील आ.राजळे उपस्थित होत्या.परंतु तरी देखील आ.राजळे यांनी बोधेगाव हत्ये संदर्भात कुठेही वाच्यता केल्याचे दिसून आले नाही हे विशेष.