बोधेगांवच्या पहिलवान बाबा मंदिरातील सेवेकऱ्याचा निर्घुण खुन…!
एका विहिरीत शीर तर दुसऱ्या विहिरीत मिळाले धड
पोलीस अधीक्षकांनी घेतली तपासाची सूत्रे हाती, एक संशयित ताब्यात….!
शेवगाव (क्राईम रिपोर्टर – इसाक शेख)
शेवगांव तालुक्यातील बोधेगावच्या उत्तरेला एकबुर्जी वस्ती नाजिक पहिलवान बाबाचे मंदिर आहे. या मंदिरात गेल्या पंधरा वर्षापासुन मंदिरात साफसफाईचे काम करणारे सेवकरी नामदेव रामा दहातोंडे वय ६८ वर्ष यांचा निर्घणपणे खुन करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, बोधेगांवच्या उत्तरेला बोधेगांव पासुन साधरण अडीच ते तीन किलोमीटरवरील अंतरावर एकबुर्जी वस्ती आणि पहिलवान वस्तीच्यामध्ये पहिलवान बाबाचे मंदिर आहे. या मंदिराचे एकनाथ भानुदास घोरतळे हे मुख्य पुजारी असुन याच मंदिरात गेल्या पंधरा वर्षापासुन झाडलोट व साफसफाईचे काम सेवेकरी नामदेव रामा दहातोंडे हे करत होते. परंतु दि.२६ जानेवारी पासुन नामदेव दहातोंडे हे अचानक बेपत्ता झाले होते.त्यावेळी शोधाशोध करून देखील ते मिळून न आल्याने मुख्य पुजारी एकनाथ घोरतळे यांनी शेवगांव पोलीसात मिसिंग तक्रार दाखल केली होती.
त्यानंतर शेवगावचे सहाय्यक पोलीस निरिक्षक धरमसिंग सुंदरडे यांनी घटनास्थळी भेट देवुन एका संशयीत आरोपीस ताब्यात घेतले होते. त्यानंतर दि.३० जानेवारी रोजी सकाळी मयत नामदेव दहातोंडे यांचे रक्ताने माखलेले व अर्धवट जळालेले स्वेटर व रुमाल सापडले.त्यानंतर मंदिराच्या पाठीमागे असलेल्या बाबासाहेब तांबे यांची विहीर आहे. काल संध्याकाळी या विहीरीत मयत नामदेव दहातोंडे यांचे मुंडके पाण्यावर तरंगताना दिसले तेव्हा पुजारी एकनाथ घोरतळे यांनी पोलीसांना माहीती दिली.
पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवुन मयत नामदेव दहातोंडे याचे मुंडके वर काढून त्याच्या मुलाकडुन त्याची ओळख पटवुन घेवुन उत्तरीय तपासणीसाठी अहिल्यानगर येथे पाठवले. दरम्यान या विहीरीत शरीराचे इतर अवयय सापडतील म्हणुन काल रात्री पासुन दोन विज पंपाव्दारे पाणी ऊपसण्याचे काम सुरु होते पण त्यात काहीच सापडले नाही. परंतु श्वान पथकाच्या माध्यमातून याच विहिरीपासून काही अंतरावर असणाऱ्या दुसऱ्या एका कोरड्या विहिरीत या मृतदेहाचे धड सापडले आहे. दरम्यान दुपारी साडेतीन ते चारचे दरम्यान जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी भेट देवुन सुमारे ४५ मिनिटे विहीर आणी परिसराची पाहणी केली तसेच मुख्य पुजारी एकनाथ घोरतळे यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली.
काल रात्री पासुन घटनास्थळी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, शेवगांव उपविभागिय पोलीस अधिकारी सुनिल पाटील, स्थानिक गुन्हा अन्वेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, शेवगावचे सहाय्यक पोलीस निरिक्षक धरमसिंग सुंदरडे, अशोक काटे, बोधेगाव दूध क्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र ससाने, पोलीस नाईक ईश्वर गर्जे, एकनाथ गरकळ इत्यादी पोलीस अधिकारी घटनास्थळी तळ ठोकुन आहेत. तर श्वान पथक, ठसे तज्ञ, यांनी घटना स्थळी भेट दिली. दरम्यान या घटनेचा तपास लावावा यासाठी विविध दलित संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. दरम्यान सदर घटनेचा पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मसिंह सुंदरडे हे करीत आहेत.