आजचे विद्यार्थी भविष्यातील लोकशाहीचा आधारस्तंभ- प्रांताधिकारी प्रसाद मते
श्री तिलोक जैन विद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन
राजेंद्र चव्हाण, पाथर्डी प्रतिनिधी:
जगामध्ये भारत हे सर्वात मोठे लोकशाही प्रधान राष्ट्र आहे. या मध्ये निवडणूक प्रक्रिया व मतदान या अतिशय महत्त्वाच्या बाबी आहेत. सक्षम लोकशाहीच्या बळकटीसाठी, योग्य लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे आजचे विद्यार्थी हे खऱ्या अर्थाने भविष्यातील लोकशाहीचे आधार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही बाब समजून घेऊन भविष्यात प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांसह समाजात मतदान जनजागृती करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी केले.
शहरातील श्री तिलोक जैन विद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तहसीलदार डॉ.उद्धव नाईक, मतदान जनजागृती अभियानाचे नोडल अधिकारी रामनाथ कराड, विद्यालयाचे प्राचार्य अशोक दौंड, पर्यवेक्षक दिलावर फकीर, सुधाकर सातपुते उपस्थित होते.
या वेळी तहसीलदार डॉ .उद्धव नाईक यांनी देखील मतदान, लोकशाही व विद्यार्थ्यांची कर्तव्ये विषद करत आपण आपल्या घरातील सर्व प्रौढांसह मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले पाहिजे या बाबत मार्गदर्शन केले. या राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने विद्यालयात विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात आले. या मध्ये मतदान जनजागृती पर रांगोळी स्पर्धा ,निबंध स्पर्धा , चित्रकला स्पर्धा इ. चे आयोजन करण्यात आले.या सह शहरातून भव्य अशी मतदार जनजागृती रॅली देखील काढण्यात आली.यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी शाहीर भारत गाडेकर यांनी मतदान जागृती करण्याच्या दृष्टीने मतदार गीत सादर केले.या संपूर्ण कार्यक्रमाची प्रसिद्धी प्रमुख म्हणून संतोष घोगरे यांनी जबाबदारी पार पाडली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मतदान जनजागृती अभियानाचे नोडल अधिकारी रामनाथ कराड यांनी केले तर सूत्रसंचालन जब्बार पठाण यांनी करून आभार प्राचार्य अशोक दौंड यांनी मानले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक गर्जे,राजेंद्र भुजबळ, आतिश भावसार, सचिन काकडे, बाळासाहेब गांगुर्डे, अजय शिरसाट, विश्वनाथ कुळधरण, गणेश ताठे, श्रीमती संध्या पालवे, छाया कर्डिले, प्रतिभा दौंड, मनिषा मिसाळ, मनिषा वंजारी आदींनी विशेष परिश्रम घेतले.