मोहटादेवीची श्रद्धेने सेवा केल्यास प्रचिती हमखास मिळते- उपजिल्हाधिकारी विनायक नरवडे
(राजेंद्र चव्हाण,पाथर्डी प्रतिनिधी)
मोहटादेवीचे स्वयंभू स्थान अत्यंत जागृत असून श्रद्धेने सेवा केल्यास येथील प्रचिती हमखास मिळते. येथून मिळालेली ऊर्जा आपल्याला प्रशासकीय सेवेसाठी सुद्धा प्रेरणादायी ठरेल, असे मत तालुक्याचे सुपुत्र तथा कर्नाटक राज्यातील मदीकेरी उपविभागाचे उपजिल्हाधिकारी विनायक नरवडे यांनी व्यक्त केले.
नरवडे यांचा विवाह दोन दिवसांपूर्वी नगर येथे झाला. नरवडे यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२१ च्या बॅच मधून आयएएस केडरसाठी निवड झाली. त्यांच्या पत्नी मीरा के. या सुद्धा आय.ए.एस. केडर साठी पात्र ठरल्या असून केरळ मधील कोची येथे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत. विवाहनंतर कुलाचार म्हणून त्यांनी सपत्नीक मोहटादेवी येथे येत महापूजा व महाआरती केली.
यावेळी त्यांचे बरोबर त्यांचे कुटुंबीय अभिजीत गायकवाड व वृंदा के. या सुद्धा उपस्थित होत्या.यावेळी चर्चा करताना श्री. नरवडे म्हणाले, माझ्या आईने पुत्रप्राप्तीसाठी मोहटादेवीला नवस केला होता.आमच्या कुटुंबाची या स्थानावर श्रद्धा आहे. प्रत्येक कार्य देवीच्या साक्षीने झाले आहे.कुटुंबाच्या परंपरेप्रमाणे आपण लग्नानंतर लगेचच सपत्नीक देवी दर्शनाला आलो आहे.
देवस्थान समितीकडून चाललेली विकास कामे व भव्य मंदिर मनाला प्रसन्नता देते.अत्यंत सुंदर व शांत परिसर वेगळीच अध्यात्मिक अनुभूती देतो. गावी आल्यावर आपण देवीच्या दर्शनासाठी निश्चित येतो.लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी प्रचंड मेहनत घेतली, खूप अभ्यास केला, तरीही देवीला सुद्धा प्रार्थना केली होती. शक्य त्या सर्व प्रकारे देवीची खूप सेवा घडावी, हातून कुठलेही चुकीचे काम घडू नये, अशी प्रार्थना आपण देवीपुढे केल्याचे नरवडे म्हणाले.
मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे व जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे यांनी देवस्थान समितीतर्फे स्वागत करून उपक्रमांची माहिती दिली. देवस्थान तर्फे अगत्यपूर्वक केलेल्या स्वागताने नरवडे पती-पत्नी अगदी भारावून गेले होते.